जिल्हा बँकेत राजेश पाटील यांचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:01+5:302021-08-14T04:30:01+5:30

चंदगड: शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील बंदी उठवल्यामुळे येत्या महिन्याभराच्या जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुक मंडळींनी संपर्क मोहीम सुरू ...

Rajesh Patil's parde heavy in district bank | जिल्हा बँकेत राजेश पाटील यांचे पारडे जड

जिल्हा बँकेत राजेश पाटील यांचे पारडे जड

Next

चंदगड:

शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील बंदी उठवल्यामुळे येत्या महिन्याभराच्या जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुक मंडळींनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. सध्यातरी विद्यमान संचालक व आमदार राजेश पाटील यांचे पारडे जड दिसत असले तरी आमदार राजेश पाटील, भरमूअण्णा पाटील व गोपाळराव पाटील यांच्याभोवतीच राजकारण फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

गतवेळी माजी आमदार नरसिंगराव पाटील व त्यांचे मेहुणे गोपाळराव यांच्यात लढत झाली. मात्र, यामध्ये अपेक्षेप्रमाणे माजी आमदार नरसिंगराव यांनी निर्विवाद विजय मिळविला होता. पण त्यांचा आपला कार्यकाल पूर्ण न होताच त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुढील राजकरणाचा वेध घेत त्यांचे सुपुत्र आमदार राजेश पाटील यांना बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली. त्यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची खेळी यशस्वी ठरली. त्यानंतर आमदार राजेश पाटील यांच्या रुपाने चंदगडची जागा राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले.

गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेवर नरसिंगराव पाटील गटाचे वर्चस्व आहे. त्यातच गोपाळराव पाटील ही भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पारडे जड दिसत आहे. मात्र, बदलत्या समीकरणानुसार चंदगडची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला मिळणार त्यावर बरेचसे अवलंबून आहे. काँग्रेसला मिळाल्यास गोपाळराव यांना संधी शक्य आहे. तसेच राष्ट्रवादीला संधी मिळाल्यास आमदार राजेश पाटील यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर संचालक म्हणून वर्णी लागू शकते.

यावेळी आमदार राजेश पाटील स्वत: रिंगणात उतरणार की त्यांचे खंदे समर्थक अभय देसाई, तानाजी गडकरी यांना संधी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे. तालुक्यात एकूण १२९ ठरावधारक आहेत. त्यामध्ये ७० ठराव आमदार राजेश पाटील यांच्याकडे आहेत. उरलेल्या ५९ ठरावांमध्ये गोपाळराव पाटील व भरमूअण्णा पाटील गटाकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे.

गोपाळराव पाटील यांना संधी न मिळाल्यास ते बंडखोरी करणार का? विरोधी आघाडीत सामील होणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणार आहेत. भरमूअण्णा पाटील हे जवळपास भाजप आघाडीत राहणार हे जवळपास निश्चित असले तरी त्यांच्याकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

-----------------

चौकट

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समझोता केला तर गोपाळरावांना आमदार राजेश पाटील यांनी जिल्हा बँकेत संधी देण्याचे मान्य होऊ शकते. त्याबदल्यात विधानसभेच्यावेळी गोपाळरावांनी आमदार राजेश पाटील यांना मदत करावी, अशा तोडगा निघू शकतो.

चौकट :

महाविकास आघाडी विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे यांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भरमूअण्णा पाटील गटाचा उमेदवार भाजपच्या रुपाने ही रिंगणात उतरविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पण उमेदवाराचे नाव मात्र गुपित ठेवले आहे.

------------------

राजेश पाटील : १३०८२०२१-गड-०२

गोपाळराव पाटील : १३०८२०२१-गड-०३ भरमूअण्णा पाटील : १३०८२०२१-गड-०४

Web Title: Rajesh Patil's parde heavy in district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.