कोल्हापुरात होणार राजर्षी शाहू मराठा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:03 AM2018-12-17T00:03:39+5:302018-12-17T00:03:45+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रथमच ‘राजर्षी शाहू मराठा महोत्सव’ कोल्हापुरात २३ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत भव्य प्रमाणात साजरा ...
कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रथमच ‘राजर्षी शाहू मराठा महोत्सव’ कोल्हापुरात २३ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या महोत्सवाच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वसंत मुळीक म्हणाले, महाराष्ट्रात अशा प्रकारचा महोत्सव झालेला नाही. जानेवारीमध्ये दसरा चौक मैदान आणि शाहू स्मारक भवन येथे एकत्रित असा भव्य प्रमाणात महोत्सव साजरा करण्यात येईल. त्यासाठी १०० स्टॉल असणार आहेत. या महोत्सवात शेती, ग्रंथ, शाहिरीसह भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, नामवंत वक्ते यांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यासाठी घरोघरी व ग्रामीण भागात या महोत्सवाची माहितीपत्रके वाटण्यात येतील. मराठा महासंघातर्फे या वेळेला सुमारे २० हजार दिनदर्शिकांचे प्रकाशन करून या माध्यमातून महोत्सवाची जनजागृती करण्यात येणार आहे. विविध समित्याही स्थापन केल्या जातील.
महोत्सवात एक स्टॉल मराठा स्वराज्य भवनासाठी असावा. तसेच पहिल्या दिवशी दिंडीचे आयोजन करावे आणि सहभाग घेतलेल्यांना मराठा समाजातर्फे प्रशस्तिपत्र किंवा चषक देऊन त्यांचा गौरव करावा, अशा सूचना उपस्थितांनी केल्या.
यावेळी डॉ. संदीप पाटील, सी. एम. गायकवाड, दीपा डोणे, शिवाजी मोरे, प्रताप साळोखे, अनिल चव्हाण, किशोर डवंग, विश्वास चौगुले, आदींनी सूचना मांडल्या. बैठकीस शशिकांत पाटील, उत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, डॉ. शिवाजीराव हिलगे, संभाजीराव जगदाळे, हेमंत दळवी, नितीन पाटील, अशोक पोवार, अजित सासने, मिलिंद ढवळे-पाटील, इंद्रजित माने, प्रताप साळोखे, सरदार पाटील, शैलजा भोसले, मंगल कुºहाडे, संग्रामसिंह निंबाळकर, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.