जिल्ह्यात राजर्षी शाहू अभियान कागदावरच

By Admin | Published: October 6, 2015 08:39 PM2015-10-06T20:39:49+5:302015-10-06T23:46:26+5:30

हातातले झाडू कोपऱ्यात : स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ

Rajshahi Shahu campaign in the district on paper | जिल्ह्यात राजर्षी शाहू अभियान कागदावरच

जिल्ह्यात राजर्षी शाहू अभियान कागदावरच

googlenewsNext

एम. ए. शिंदे -हलकर्णी -स्वच्छ भारत अभियानाला राष्ट्रपिता
म. गांधी यांच्या जयंतीदिनी एक वर्ष पूर्ण झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. काळाच्या ओघात हातातले झाडू कोपऱ्यात विसावले. या अभियानाला कायम राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने राजर्षी शाहू ग्राम स्वच्छता अभियान स्वातंत्र्यदिनी हाती घेतले. सध्या राजर्षी शाहू ग्राम स्वच्छता अभियान कागदावरच आहे, अशी स्थिती गावागावांत आहे.
श्रमदानातून गावे स्वच्छ व्हावीत, ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढावी, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध व्हावी, शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी, हे उदात्त उद्देश नजरेसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजर्षी शाहू स्वच्छता अभियानाची घोषणा केली.
अभियानाचा कालावधी १५ आॅगस्ट ते ३१ मार्च २०१६ असा जाहीर करतानाच जिल्हा परिषद मतदारसंघ, तालुकास्तर, जिल्हास्तर अशा बंपर बक्षिसांची घोषणा केली. आतापर्यंत दोन ग्रामसभा झाल्याच्या कागदोपत्री नोंदी झाल्या. मात्र, स्वच्छता अभियान कुठेच चालू नाही. श्रमदानातून स्वच्छता करताना ग्रामस्थ कोठे दिसतच नाहीत. आजही अनेक गावांतून गावकरी उघड्यावर शौचाला जाताना दिसतात. त्यांच्यासाठी शौचालये बांधण्याची मानसिकता कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून पित आहेत. पाण्याचे स्त्रोतच आटले आहे, तर त्यांचे बळकटीकरण कसे होणार. सांडपाणी व्यस्थापनाची तर बिकट अवस्था आहे. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख, दोन लाख अशीे बक्षिसे दिलेी जाणार आहेत. ३० लाखांच्या बक्षिसांच्या रकमेची तरतूद जिल्हा परिषदेच्या स्व:निधीतून केली जाणार आहे.
सध्या हे अभियान ठप्प अवस्थेत आहे. कालावधी जसा अंतिम टप्यात येईल तशी गावपातळीवरील पुढाऱ्यांना अभियानाची जाग येईल, उपक्रम राबविले जातील, फोटो सेशन होईल, प्रसिद्धी दिली जाईल, अल्बम तयार होतील आणि परीक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होईल. मात्र, अभियानात संपूर्ण कालावधीत सातत्य राहणार नाही. भपकेबाज कार्यक्रम होतील. बक्षिसांची लयलूट होईल. जिल्हा परिषदेच्या स्व:निधीतून ३० लाख खर्ची पडतील. मात्र, स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासला जाईल. प्रत्येक ग्रामस्थ स्व:मनाने स्वच्छतेचे महत्त्व बिंबवून घेऊन स्वत:पासूनच स्वच्छतेला प्रारंभ करेल, तो दिवस गावच्या भाग्यात ‘सुदिन’ असेल.

जिल्हा आणि तालुका पातळीवर बक्षिसे
जिल्हा परिषदेच्या ६९ मतदारसंघांतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांच्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस ५० हजार, द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस २५ हजार, तर तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस दहा हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Web Title: Rajshahi Shahu campaign in the district on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.