राजर्षी शाहू जयंतीला व्यापक स्वरूप देऊया

By admin | Published: June 20, 2016 12:54 AM2016-06-20T00:54:32+5:302016-06-20T00:54:32+5:30

मेळाव्यात निर्धार : शोभायात्रेसाठी तालीम, संस्थांनी देणगी नाकारत समितीलाच देणगी जाहीर केली

The Rajshahi Shahu Jayanti gave a wide spectrum | राजर्षी शाहू जयंतीला व्यापक स्वरूप देऊया

राजर्षी शाहू जयंतीला व्यापक स्वरूप देऊया

Next

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीला यावर्षी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार रविवारी शाहूप्रेमी तालीम आणि संस्थांनी केला. शाहू जयंती लोकोत्सव समितीतर्फे शोभायात्रेसाठी देण्यात येणारी देणगी विनम्रपणे नाकारीत शहरातील तालीम, संस्थांनी स्वत:च देणगी जाहीर करून ती समितीकडे सुपूर्द करून शाहूविचारांची बांधीलकी जोपासली.
प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी (दि. २६) राजर्षी शाहू जयंती सर्वत्र साजरी होत आहे. ही जयंती न होता लोकोत्सव व्हावा, या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम संस्था, क्लब, तरुण मंडळे, शाहूप्रेमी विचारांचे कार्यकर्ते, आदींचा मेळावा छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथील शिंदे लॉन येथे आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष पै. बाबा महाडिक होते. प्रमुख उपस्थिती राजू सावंत, अनिल चौगुले, डॉ. संदीप पाटील, बी. जी. पाटील, कृष्णात पाटील, शाहीर शहाजी माळी, आदींची होती.
राजर्षी शाहू महाराजांची जयंती सोहळ्याचे स्वरूप मोठे व्हावे व त्याचा भव्यदिव्यपणा राज्यभर पसरावा, याकरिता समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये ‘पाणी वाचवा, बेटी बचाव,’ आदी समाजप्रबोधन करणारे फलक आणि बैलगाड्या सहभागी होणार आहेत. या यात्रेत चित्ररथासह सहभागी होण्यासाठी बाबा महाडिक यांनी शहरातील सर्व तालीम संस्थांना आर्थिक देणगी देण्याचा मानस व्यक्त केला होता; परंतु ही देणगी रविवारी तालीम संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी न स्वीकारता उलट स्वत:हून देणगी जाहीर करीत ती समितीकडे दिली.
राजू सावंत म्हणाले, शाहूंचे सर्व क्षेत्रांतील कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी तालीम, संस्थांपर्यंत जाण्याचा बाबा महाडिक यांचा उद्देश स्तुत्य आहे. त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळून हा लोकोत्सव घराघरांत साजरा होईल.
सुधर्म वाझे म्हणाले, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शाहूंच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा तयार करून तिचा प्रसार करावा.
डॉ. पाटील यांनी शाहूकालीन वास्तूंविषयी शाहूप्रेमींनी सविस्तर माहिती घेऊन ती समाजातील सर्व घटकांना द्यावी, असे आवाहन केले.
अनिल चौगुले यांनी शाहूंचे विचार आत्मसात करण्याची गरज असून, प्रत्येकाने स्वत: महाराजांचा इतिहास समजून घेऊन किमान आपल्या शेजाऱ्याला सांगण्याचे कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.

Web Title: The Rajshahi Shahu Jayanti gave a wide spectrum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.