“सत्ताधाऱ्यांकडून बळीराजाची लूट, शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:46 AM2021-10-18T10:46:19+5:302021-10-18T10:47:11+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत.
कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवरून नाव कमी करण्यात आल्याच्या चर्चांनंतर राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच पूरात प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याबाबतही राजू शेट्टी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच असून, किंबहुना त्यांचे एकमत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही?
साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसते मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचे एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे, असा सवाल करत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो, तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांत आघाडीवर असेन, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना उसाची सगळी रक्कम एकाच टप्प्यात दिली पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांची घेतली असून, याउलट शरद पवार यांनी मात्र उसाची रक्कम एका टप्प्यात न देता तीन टप्प्यात द्यावी, असे म्हटले आहे. साखर कारखानदार नाही. उसाला एक रकमी रक्कम द्या, असा एक शब्द निघाला आहे. तुमचे मत असेल तर त्यासाठी आग्रह धरेन. परंतु, ऊस गेला की रक्कम द्या, असे म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.