Raju Shetti : '... तर सामूहिक जलसमाधी नक्की, जगण्यात अर्थ राहिला नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:07 PM2021-08-23T19:07:55+5:302021-08-23T19:08:50+5:30
Raju Shetti : सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे
कोल्हापूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरीव मदत न मिळाल्यास सामूहिक जलसमाधीशिवाय पर्याय नाही, असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जाहीर केलेल्या मदतीवरही त्यांनी भाष्य केलं. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
'मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मी मदत करणारा आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नुसती घोषणाच केली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे, शेतकऱ्यांची केलेली ही चेष्टा आम्ही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिला नाही', असे ठणकावत २३ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टींनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार, आज त्यांनी मोर्चा काढला.
सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही शेट्टींनी प्रहार केला.
शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी
मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर व सांगली दौऱ्यात शेतकऱ्यांना मोठी मदत करण्याची ग्वाही दिली होती पण प्रत्यक्षात एकराला तीन ते चार हजार रुपयेच मिळणार आहेत. कुजलेला ऊस काढायला 10 हजार रुपये आणि मदत मिळणार 10 हजार रुपये. त्यामुळे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. ही चेष्टा आम्ही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय असा इशारा शेट्टींनी दिला होता.