तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:01 PM2024-04-26T12:01:37+5:302024-04-26T12:02:15+5:30
'सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी'
शिरटे : ग्रामीण भागात शेतीची राखण करणारा म्हसोबा प्रत्येक गावात असतोच. त्याप्रमाणेच मीदेखील तुमच्या उसाची राखण करणारा म्हसोबाच आहे. पाच वर्षांतून फक्त एकदाच मला नैवेद्य दाखवा, म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो, अशी साद हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना घातली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला शेट्टी यांनी सुरवात केली. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. माजी उपसरपंच संदीप दबडे उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, पक्ष बदलणारे लाेक आणि साखर कारखानदार एकत्र येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांवर प्रचंड दबाव आणत आहेत. कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत; परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे, हे त्यांनी विसरू नये.