सफरचंद उत्पादकांसाठी राजू शेट्टी काश्मीरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:25 AM2019-11-13T04:25:43+5:302019-11-13T04:25:47+5:30
ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत.
कोल्हापूर : ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारपासून (दि. १३ ते १५) तीन दिवस सफरचंद उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. राज्यपालांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंतीही केली जाणार आहे.
काश्मीरमध्ये सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे; पण कलम ३७० रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीमुळे काढणीस आलेले हे फळ विक्री करण्याचे मोठे आव्हान काश्मीरमधील उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. व्यापारीच येत नसल्याने जवळपास २० लाख टन सफरचंद बागांमध्येच सडत असल्याने नुकसानीचा आकडा साधारणपणे २० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. यामुळे हतबल झालेल्या उत्पादकांनी राजू शेट्टी यांना विनंती करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळ आजपासून तीन दिवस काश्मीरमधील उत्पादकांची भेट घेणार आहे.