'शेतकरी आळशी तर शेतकऱ्यांचा कारखाना घशात घालणारे रोहित पवार हुशारच', राजू शेट्टींंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:40 AM2022-04-18T10:40:49+5:302022-04-18T10:42:44+5:30
Raju Shetty News: ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-यांनी काबाडकष्ट करुन उभा केलेला कारखाना घशातही घातला
कोल्हापूर - ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-यांनी काबाडकष्ट करुन उभा केलेला कारखाना घशातही घातला, असे रोहित शेतक-यांच्या घरात जन्माला यायले पाहिजे होते का, असा खोचक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतक-याला दिवसा वीज मिळावी, हमीभाव कायदा झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, संपूर्ण देश ढवळून काढणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर बळीराजा हुंकार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली सभा नांदणी (ता.शिरोळ) येथील गांधी चौकात झाली. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते.स्वागत सागर शंभूशेटे यांनी केले. सावकर मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. निवडणुकीत पराभूत झालो याचे दुःख नाही. शेतक-यांचे नुकसान झाले आहे, याचे दुःख आहे.
शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच महागार्इने शेतकरी भरडला जात आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला आहे. यावर्षी एफआरपीमध्ये 75 रुपयाची वाढ मोदी सरकारने केली आहे. उतपादन खर्च प्रतिटन सव्वादोनशे रुपयांनी वाढला आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी सुवर्णा अपराज, राम शिंदे, सावकर मादनाईक, सचिन शिंदे, प्रकाश परीट, तानाजी वठारे, विशाल चौगुले, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, नंदकुमार पाटील, पापालाल शेख यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, नांदणी गावाने 1 लाख 91 हजार, स्वाभिमानी मार्ट कंपनीकडून 1 लाख, उपकारनगर जयसिंगपूर 1 लाख, जयकुमार कोले 51 हजाराचा धनादेश माजी खासदार शेट्टी यांना देण्यात आला.