मुख्यमंत्र्यांना भेटताना गृहपाठ करून जायला हवं, राजू शेट्टींचा आबीटकर, धैर्यशील मानेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:09 PM2022-07-14T18:09:35+5:302022-07-14T18:10:44+5:30
प्रोत्साहन अनुदानासाठी आता निवेदनाचे नाटक कशाला करता, गेली अडीच वर्षे तुमचेच मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर याद राखा.
कोल्हापूर : प्रोत्साहनपर अनुदानासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार म्हटल्यावर आमदार प्रकाश आबीटकर व खासदार धैर्यशील माने हे घाईगडबडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचे पैसे मिळणार म्हणून सांगितले. मात्र, आडसाल पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांत दोनच वेळा पीक कर्ज मिळते. त्यामुळे त्यांनी थोडा गृहपाठ करून मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे होते, असा निशाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लगावला.
प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे, यासाठी ‘स्वाभिमानी’ने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, मंगळवारी खासदार माने व आमदार आबीटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. त्याचे पडसाद बुधवारच्या मोर्चात उमटले.
राजू शेट्टी म्हणाले, आमदार प्रकाश आबीटकर यांचे भाऊ व खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पीककर्जाची उचल व मुदतीबाबत त्यांना माहिती हवी होती. महापूरग्रस्त शेतकरी तीन वर्षांतून दोन वेळा पीककर्ज घेतो. अभ्यास करून त्यांनी मुद्दा मांडायला हवा होता.
नुसते ट्वीट नको
मागील महापुरातील नुकसानभरपाई युती सरकारपेक्षा अधिक देऊ, असे ट्वीट तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, प्रत्यक्षात ९३५ सोडा १३५ रुपये गुंठ्याला मिळाले. त्यामुळे अशा ट्वीटवर आमचा विश्वास नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, असे शेट्टी यांनी सांगितले.
बंडखोर आमदार, ५० खोकी आणि दुर्दैव
राज्यातील सत्तानाट्यावर प्रा. जालंदर पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. बंडखोर आमदारांना सांभाळण्यासाठी ३ हजार कोटी खर्च आला. तेथून ते ५० खोकी सोबत घेऊन घरी आल्यानंतर जेसीबीने गुलाल उधळून सत्कार करता, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अडीच वर्षे तुमचेच मुख्यमंत्री...
प्रोत्साहन अनुदानासाठी आता निवेदनाचे नाटक कशाला करता, गेली अडीच वर्षे तुमचेच मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांची फसवणूक केली, तर याद राखा, असा इशारा अनिल मादनाईक यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला.