राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ?, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने फोनवरून चर्चा केल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:09 PM2024-01-18T14:09:14+5:302024-01-18T14:10:02+5:30
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ...
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ घातली असल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शेट्टी यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीतूनही शेट्टी यांना लढण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शेट्टी यांनी मात्र इचलकरंजीतील मेळाव्यात ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून ऑफर असताना शेट्टी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
या मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत. मात्र, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत त्यांच्याबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याचा अहवाल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेची एक हक्काची जागा कमी होण्यापेक्षा एनडीए आघाडीतील पूर्वाश्रमीचे मित्र असलेल्या राजू शेट्टी यांनाच जवळ करत ही जागा सेफ करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्या अनुषंगानेच शेट्टी यांच्याशी जुळवून घेण्यासाठी पावले टाकली जात असल्याचे कळते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शेट्टी हे गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर एनडीए आघाडीत आले होते. मात्र, पुढे मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत ते यातून बाहेर पडले. काँग्रेस-राष्ट्रवादी साथ घेत त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली; पण त्यात त्यांना अपयश आले होते.