विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप
By राजाराम लोंढे | Published: November 1, 2024 02:27 PM2024-11-01T14:27:41+5:302024-11-01T14:28:30+5:30
जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांची चळवळ विकली असून विश्वासघातकी राजकारणामुळे महाराष्ट्रातील एक-एक बिनिचे शिलेदार सोडून जात आहे. चळवळीला ते सत्तेत जाण्याचे साधन म्हणून वापरत आहेत, हे घातक असून आगामी काळात शेतकऱ्यांचे रक्क सांडून ताकदवान बनलेली चळवळीला ओहोटी लागल्याचे दिसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी टीका केली. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्याकडे दिला.
वैभव कांबळे म्हणाले, आतापर्यत शेट्टी यांनी भारत भालके, देवेंद्र भुयार, संजय घाटगे, अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली, पण निवडणूकीनंतर संघटनेकडे त्यांनी पाहिलेही नाही. आताही सुजीत मिणचेकर हेही यापेक्षा वेगळे करणार नाहीत. शेट्टी यांच्या या वागणूकीमुळेच आतापर्यंत रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण चळवळीपासून दूर गेले. यावेळी शिवाजी आंबेकर, सुनील पाेवार, सुहास लाटवडेकर आदी उपस्थित हाेते.
प्रा. पाटील, मादनाईक यांची भूमिका लवकरच
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हेही शेट्टी यांच्या भूमिकेने अस्वस्थत आहेत. सावकर मादनाईक यांनी तर उघड भूमिका घेतली आहे. लवकरच या दोघांची भूमिका स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी सांगितले.
अन् मादनाईक रुग्णालयात
‘हातकंगले’त जसे फसवले तसेच शिरोळमध्ये झाले. उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सावकार मादनाईक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आयुष्यभर चळवळीत घालवून ही अवस्था होत असेल तर नेतृत्वाबद्दल काय बोलाचये? असा प्रश्न वैभव कांबळे यांनी केला.