राजू शेट्टींना किंमत चुकवावी लागेल
By Admin | Published: April 5, 2016 01:38 AM2016-04-05T01:38:05+5:302016-04-05T01:38:05+5:30
मुश्रीफांचा पलटवार : ‘बिद्री’, ‘भोगावती’ची एफआरपी १५ पर्यंत द्यावी
कोल्हापूर : कारखानदारांनी मेपासून ‘एफआरपी’तील उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे श्रेय मिळणार नसल्याच्या रागातून राजू शेट्टी आपल्यावर राग काढत आहेत. त्यांच्या वेदना मी समजू शकतो; पण त्यांनी औैरंगजेब, रावण, आदी जातीयवादी विधाने करीत लायकी समाजापुढे दाखविली आहे. याची मोठी किंमत त्यांना लोकसभा निवडणुकीत चुकवावी लागेल, असा इशारा देत आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिले.
शासनाचे प्रशासक असलेल्या ‘बिद्री’ व ‘भोगावती’ कारखान्यांची उर्वरित एफआरपी सहकारमंत्री व शेट्टी यांनी १५ एप्रिलपर्यंत देऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेच्या ठेवी हजार कोटींनी वाढून बॅँक नफ्यात आली. पाच हजार कोटी रुपयांचा ठेवींचा इष्टांक, शून्य टक्के एनपीए, संस्थांना लाभांश देण्यासाठी जिवाचे रान करू, असे मी जाहीर केले आहे. यामुळे शेट्टी यांची मती गुंग झाली आहे. साखरेला प्रतिक्विंटल ३८०० रुपये दर असल्याचे सांगतात. १० लाख क्ंिवटल साखर ३७०० रुपयांनी देण्यास तयार आहोत. शेट्टी यांनी ती घ्यावी. पवार यांच्यामुळेच साखरेचे दर पडल्याचा कांगावा ते करीत आहेत. उलट जिल्हाधिकाऱ्यांनी साखर ताब्यात घेऊन लिलावात काढावी, या शेट्टी यांच्या वक्तव्यामुळे साखरेचे दर पाडून व्यापाऱ्यांचे हित जोपासण्याचे काम शेट्टी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी दर वाढत असताना छापे टाकण्याची मागणी करून व्यापाऱ्यांमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडून घबराट पसरविली होती. दर पडल्यानंतर ज्यांनी साखर खरेदी केली, त्यांचे फोन कॉल तपासण्याची मागणी केल्यानंतर शेट्टी मूग गिळून गप्प बसले. आता पुन्हा तोच प्रकार ते करीत असून साखर जप्त करून त्याची पुढील प्रक्रिया होईपर्यंत मे महिना उजाडणार आहे. मग कारवाईसाठी अट्टहास का? काटे आॅनलाईन झालेच पाहिजेत. जो खर्च होईल, तो कारखाने देतील.