जलसमाधी आंदोलनावर ठाम- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:16+5:302021-08-29T04:25:16+5:30
पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे. त्याचे शासन परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. ...
पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे. त्याचे शासन परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. निर्णय न झाल्यास रविवार (दि. 5) रोजी हजारो शेतकऱ्यांसोबत नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीपात्रात जलसमाधी घेणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
येथील जैन सांस्कृतिक सभागृहात संघटनेच्या जलसमाधी आंदोलनासाठी आयोजित संघटनेच्या नियोजन मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्बन बँकेचे संचालक मोनाप्पा चौगुले होते.
शेट्टी म्हणाले की, कृषीमूल्य आयोग शेतकरी विरोधी आहे, असा आरोप करत पूरग्रस्तांच्या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन केल्याने व जनतेचा रोष ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१९ प्रमाणे पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे; मात्र ही घोषणा केवळ राजकीय आहे, असे सांगून यावर आमचा विश्वास नाही. घोषणेचा शासन आदेश काढावा, शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत, जिल्ह्यातील पुलाचा भराव खुला करावा ,पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या मागण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे या निर्णयाचा अध्यादेश आणि अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहे.
यावेळी आण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगिरे, राजू कूपवाडे, सागर शंभुशेट्टी यांची भाषणे झाली. मेळाव्याला बंडू उमडाळे, नगरसेवक शैलेश चौगुले, शैलेश आडके, अकिवाट सरपंच विशाल चौगुले, बंडू पाटील, दीपक परीट, रामचंद्र फुलारे, कल्लाप्पा शिवमूर्ती, दिलीप पाटील यांच्यासह तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ -कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खास. राजू शेट्टी बोलत होते. यावेळी कल्लाप्पा चौगुले, दिलीप पाटील, शैलेश आडके आदी.