भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:20 PM2024-05-03T13:20:31+5:302024-05-03T13:23:09+5:30
'निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ अशी अफवा'
शिरोळ : ज्या भाजप सरकारने साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेतला, महिलांवर अत्याचार केला, त्यांच्यासोबत कदापि जाणार नाही. निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी अफवा पसरवली जात असून, मी सोबत जाण्याइतकी भाजपची लायकी नसल्याची टीका ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी केली. शिरोळ येथील शिवाजी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, शेती उत्पादनांना हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा मंजूर होण्याची गरज आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर २४ पिकांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर मी लढाई करत आहे. भूमी अधिग्रहणाचा विषय महत्त्वाचा आहे. चुकीचा प्रचार करून मला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी कितीही आडवा पाय मारण्याचा प्रयत्न केला तरी मी दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही.
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील एकही प्रश्न मार्गी लावला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या गप्पा मारण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नसून, अशा निष्क्रीय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आली आहे. यावेळी सावकार मादनाईक, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.