कृषिमंत्री म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:17 PM2019-11-28T12:17:48+5:302019-11-28T12:24:41+5:30

घटकपक्ष या नात्याने हे दोन्ही नेते सहभागी झाले तरी त्यांना पदाशिवाय ठेवणे पुढील काळात अडचणीचे ठरणार असल्यानेच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा यामागे विचार असल्याची चर्चा आहे.

Raju Shetty named as Agriculture Minister | कृषिमंत्री म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आघाडीवर

कृषिमंत्री म्हणून राजू शेट्टी यांचे नाव आघाडीवर

Next
ठळक मुद्देपद मिळाले तर कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदांची हॅट्ट्रिक होणार आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र विकास आघाडीच्या आज, गुरुवारी स्थापन होत असलेल्या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा आहे. कृषिमंत्रिपदासाठी सध्या त्यांचेच नाव आघाडीवर असून, बुधवारी दिवसभर मुंबईत झालेल्या भेटीगाठींमध्येही याभोवतीच चर्चा फिरत राहिली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोण-कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. या तीन पक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांतील नेत्यांकडूनही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू करण्यात आले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण भवनमध्ये झालेल्या बैठकीत आज, गुरुवारी होणारा शपथविधी, संभाव्य मंत्री आणि दिलेल्या आश्वासनांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्रिपद वाटपाच्या फॉर्म्युल्यासह घटकपक्षांना दिल्या जाणाºया सत्तेच्या वाट्यावरही चर्चा झाली. त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व निर्माण केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रक्रमाने घेतले जात आहे.

शेट्टी यांनी लोकसभेपासून काँग्रेस आघाडीशी केलेला घरोबा विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ‘बहुजन वंचित आघाडी’ची आॅफर असतानाही त्यांनी काँग्रेस आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आघाडीच्या जागावाटपात सहा जागा मिळाल्या तरी, देवेंद्र भुयार यांच्या रूपाने त्यांचा एकच आमदार निवडून आला आहे. एक जरी आमदार असला तरी राजू शेट्टी यांचे नैतिक बळ मोठे आहे. शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे. कृषिराज्यमंत्रिपदासाठी ‘प्रहार’ पक्षाकडून निवडून आलेल्या आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांचे नाव घेतले जात आहे.
-------------------------------
उपद्रवमूल्य रोखण्यासाठी खेळी
भिन्न विचारसरणी असली तरी सत्तेसाठी एकत्र आलेले हे सरकार पाच वर्षे टिकून राहावे म्हणून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच उपद्रवमूल्य असणाºया नेत्यांवरच मोठी जबाबदारी टाकून त्यांना अडकवून ठेवण्याचीही रणनीती खेळली जात आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देऊन त्याची सुरुवात झाली आहे. राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांचे उपद्रवमूल्यही मोठे आहे. घटकपक्ष या नात्याने हे दोन्ही नेते सहभागी झाले तरी त्यांना पदाशिवाय ठेवणे पुढील काळात अडचणीचे ठरणार असल्यानेच त्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा यामागे विचार असल्याची चर्चा आहे.

कोल्हापुरातून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात असले तरी कोल्हापुरात किती पदे द्यायची, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरीदेखील पद मिळाले तर कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदांची हॅट्ट्रिक होणार आहे.
 

Web Title: Raju Shetty named as Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.