सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ नाही : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:16 AM2019-01-22T11:16:32+5:302019-01-22T11:22:10+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही सरकारच्यादृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. लबाडांचे दिवस भरले असून, सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
आंदोलन होऊच नये म्हणून गेले दोन दिवस सरकारच्यावतीने दडपशाही सुरू असल्याचे सांगत आत टाकायचे झाल्यास आमदार म्हणून पहिल्यांदा आम्हाला टाका, शेतकऱ्यांवर दडपशाही कराल तर याद राखा, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.
खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या सवलतीच्या नावाखाली महावितरण कंपनी सरकारला लुटत आहे, तरीही आमच्या नावावर कोट्यवधीची थकबाकी दाखविली जाते. एकदा घोंगड्यावर बसून हिशोब करूयाच. शेतकऱ्यांना फसवाल तर आता गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून एका एकाला तुडविल्याशिवाय सोडणार नाही.
आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारने स्मारकांची आश्वासने देऊन छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना फसवले तिथे शेतकऱ्यांचे काय? आताही ते आश्वासन देतील, पण विश्वास ठेवायला नको.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकारने यापूर्वी नुसते आश्वासन दिले होते; पण अध्यादेश म्हणजे ब्रह्मवाक्य असल्याने तो काढण्यासाठी आमचा आग्रह आहे. तारखेचा घोळ होत पत्र वाईवरून कोल्हापुरात आले असेल तरी ते कोल्हापुरात आले हे खरे गमक आहे. हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने मंत्र्यांनी पत्र दिल्याने त्यांना आश्वासन पाळावेच लागेल.
कारखानदारांनीही जरा तुरुंगात यावे
साखर कारखान्यांवरील आंदोलनामुळे आमच्यावर अगोदरच सर्व कलमे लागल्याने सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. कारखानदारांनी जरा आमच्यासोबत तुरुंगात यावे म्हणजे तिथेच त्यांची चांगली चौकशी होईल, असा टोला शेट्टी यांनी हाणला.
बालहट्टाप्रमाणे मंत्री हट्टही पुरविला
घरी आल्यानंतर तुमच्या मागण्या काय? अशी विचारणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावर, गेल्या साडे चार वर्षांतील निवेदनांवर नुसती नजर टाकली असती तर मागण्या पाठ झाल्या असत्या, असे सांगितले. स्त्रीहट्ट, बालहट्टाप्रमाणे मंत्र्यांचा हट्टही असतो, त्यानुसार त्यांना नवीन पत्र करून दिल्याचा चिमटा प्रा. पाटील यांनी काढला.
२९ फेबु्वारी म्हटले नाही हे नशीबच
शासकीय अध्यादेश काढण्याच्या तारखांवरून प्रा. पाटील यांनी मंत्री पाटील यांचे चांगलेच चिमटे काढले. मंत्री पाटील यांनी पहिल्यांदा २८ फेबु्वारीचे पत्र दिले. त्यांनी २९ फेबु्वारी तारीख दिली नाही, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण त्यासाठी आणखी दीड वर्षे वाट पाहावी लागली असती, अशी टीका प्रा. पाटील यांनी केल्यानंतर एकच हशा पिकला.
संपतरावांकडून कारखानदारांचा चिमटा
वीज दरवाढविरोधातील आंदोलनात साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिले, पण त्यांनी एफआरपी द्यायची नाही, असे ठरवून २३०० रुपये उसाला दिले. खरेच ते शेतकऱ्यांच्या बाजूने असतील तर सरकारची देणी प्रलंबित ठेवून एफआरपी द्यावी, असा टोला संपतराव पवार यांनी हाणला, त्यास शेतकऱ्यांनी घोषणा देऊन पाठिंबा दिला.
आपत्कालीन पथक तैनात
पंचगंगा पुलानजीकच दर्ग्यासमोर आंदोलनकर्ते ठिय्या मारून होते. येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पंचगंगा नदीपात्रात आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
दादा, गाजर नको ‘एफआरपी’चे बोला
मंत्री चंद्रकांत पाटील आंदोलनस्थळी आल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ‘एकच गट्टी राजू शेट्टी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मंत्री पाटील आश्वासनाचे पत्र वाचून दाखवित असताना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. ‘दादा गाजर नको, एफआरपीचे बोला’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. एन. डी. पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
शिरोली ग्रामपंचायतीचे सहकार्य
आंदोलनस्थळी ट्रॉलीतच स्टेज उभे केले होते. त्याचबरोबर खुर्च्या, शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था शिरोली ग्रामपंचायतीने केली होती. यासाठी सरपंच शशिकांत खवरे, सदस्य अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, जोतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, राजू सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.