राजू शेट्टी-संजय मंडलिक यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:13 AM2019-04-25T00:13:28+5:302019-04-25T00:13:33+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीलाच खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात जी एक ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीलाच खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात जी एक हवा तयार झाली, ती बदलण्यात त्यांना फारसे यश आले नाही. गेल्या पाच वर्षांतील त्यांची सोईची राजकीय भूमिका हीच त्यांना अडचणीची ठरली.
राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते भाजप व त्यातही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जास्त प्रामाणिक राहिले. निवडणुकीत मंत्री पाटील यांची मदत होऊ शकेल, असा एक होरा होता; परंतु मंत्री पाटील यांना तशी भूमिका घेणे जमले नाही. भाजपला म्हणजेच पर्यायाने मंत्री पाटील यांना बळ देण्यात महाडिक गटाने ताकद पणाला लावली. जिल्हा परिषदेच्या राजकारणात महाडिक सोबत होते, म्हणूनच भाजपची सत्ता येऊ शकली. महापालिकेतही ते चांगले यश मिळवू शकले; परंतु लोकसभेला मात्र त्याच महाडिक यांना पराभूत करण्यासाठी भाजपची यंत्रणा सक्रिय राहिली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे विरोध करतील याचा अंदाज महाडिक यांना होता; परंतु ते इतक्या टोकाला जाऊन थेट मैदानातच उतरतील, असे कदाचित वाटले नसावे. एकाच महाडिक घरात सत्तेची किती पदे, हा मुद्दाही चर्चेत आणला. ‘गोकुळ’ दूध संघ मल्टिस्टेट केल्यास त्यावर महाडिक यांचा कायमस्वरूपी कब्जा होईल, याबद्दलही लोकांत नाराजी होती, त्याचाही त्रास खासदार महाडिक यांना होऊ शकतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही काँग्रेस विजयाच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे चित्र फारच कमी दिसले.
पाच वर्षे महाडिक ज्यांच्यासोबत राहिले तो भाजप पक्ष म्हणून विरोधात गेला व ज्यांच्या विरोधात काम केले त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ खासदार महाडिक यांच्यावर आली. काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील हे पक्षाची आघाडी म्हणून प्रचारात सक्रिय राहिले; परंतु खुपिरे येथील बैठकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पराभवाची आरोळी दिल्याने करवीर मतदारसंघात ते जास्त त्वेषाने प्रचारात उतरले.
गेल्या निवडणुकीत महाडिक यांना करवीर मतदारसंघाने ३४ हजारांचे मताधिक्य दिले होते. राधानगरीने २४ हजारांचे व कोल्हापूर दक्षिणने सात हजारांचे मताधिक्य दिले होते. या तिन्ही मतदारसंघांत यावेळी अशी स्थिती नाही. राधानगरीत सरवडे परिसरात तर महापालिकेच्या राजकारणाचे पडसाद उमटल्याचे चित्र होते. कागलमध्ये स्थानिक उमेदवार म्हणून संजय मंडलिक यांना मतदान जास्त होणार, हे स्वाभाविकच आहे; परंतु विरोधातील राष्ट्रवादीचा गट मात्र जमेल तसा प्रचार करतोय, असे चित्र पाहायला मिळाले. चंदगडला महाडिक गटाने काही जोडण्या जरूर केल्या असल्या तरी त्यातून गतवेळचे मताधिक्य कमी होईल. आजºयातही भाजपच्या गटाने घड्याळ हातात घेतल्याचे सांगण्यात येते.
महाडिक गट मात्र कॉन्फिडंटच!
या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाडिक यांच्यासोबत आहे व मोदी लाट तेवढी प्रभावी नाही, या त्यांच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. उमेदवार म्हणून महाडिक यांची प्रतिमा जास्त प्रभावी होती; त्यामुळे लोक काम पाहून व चांगला उमेदवार म्हणून आपल्याला मते देतील, असा महाडिक गटाचा कयास आहे. महाडिक यांना सगळ्यांत महत्त्वाचा सपोर्ट महिलांचा मिळेल, हे नक्कीच आहे. अरुंधती महाडिक यांच्या प्रयत्नांमुळेच गेल्या निवडणुकीत महाडिक हे मोदी लाटेतही विजयापर्यंत गेले होते. या निवडणुकीतही त्यांना तोच एक मोलाचा आधार आहे. केलेली विकासकामे व चांगली प्रतिमा या बळावर काही झाले तरी खासदार महाडिकच विजयी होतील, असा विश्वास महाडिक गटाला वाटतो.