'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:05 PM2024-01-02T19:05:32+5:302024-01-02T19:06:40+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

'Raju Shetty should not be supported in Mahavikas Aghadi'; The appeal of Muralidhar Jadhav of the Thackeray group | 'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

'राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नये'; ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांचं आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजू शेट्टींची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली, राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत थारा देऊ नये. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले आहे. 

महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, "महाविकास आघाडीसोबत माझं काहीही देणं घेणं नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक पद्धतीने एफआरपीचे तुकडे केले, भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्याजवळ जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदलला मिळायचा तो कमी करण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकारने केलं," अशी टीका करत राजू शेट्टी यांनी आपण मविआसोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे.  

"उद्धव ठाकरेंची मदत घेणार"

"उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. २००० साली  चार हजार रुपये इतका भाव होता, २४ वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे. याचं कारण मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांतून आयात झालेल्या कच्च्या तेलावर आयात शुल्क २०२५ पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मी मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे. या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांची मदत घेणार असून उद्धव ठाकरेंनीही आम्हाला त्याबाबत आश्वस्त केलं आहे," असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Web Title: 'Raju Shetty should not be supported in Mahavikas Aghadi'; The appeal of Muralidhar Jadhav of the Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.