Maharashtra Vidhan Sabha 2019: 'स्वाभिमानी'ला हवा सन्मान, राष्ट्रवादीकडे मागितलं 'घरचं मैदान'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:36 PM2019-09-20T12:36:21+5:302019-09-20T12:40:13+5:30
शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे.
कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे.
जागा सुटत नसल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही ‘स्वाभिमानी’कडून सुरू आहे. येथून सावकर मादनाईक अथवा स्वत: राजू शेट्टीच रिंगणात असणार आहेत. ही जागा संघटनेकडे गेल्यास अडचण होणार, हे गृहीत धरून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बंडखोरीस प्रवृत्त करण्याच्याही हालचाली सुरू आहेत.
शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला; पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली. शिवसेनेची उमेदवारी घेत त्यांनी विजयही मिळविला. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
‘स्वाभिमानी’चे उमेदवार सावकर मादनाईक हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. स्वाभिमानी आणि भाजपची युती होती. आता स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यांनी चार जागा मागितल्या असल्या तरी शिरोळवर प्राधान्याने हक्क सांगितला आहे.
शिरोळ मिळाले नाही तर आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचाही निर्धार करण्यात आला आहे. आघाडी धर्म म्हणून ‘स्वाभिमानी’ला जागा दिली तरी यड्रावकरांना बंडखोरी करायला लावण्याच्या हालचाली वाढल्याने सावध झालेल्या ‘स्वाभिमानी’ने गुरुवारी कोल्हापुरात निवडक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन सन्मानाने जागा सुटल्या नाहीत तर सर्वच जागा स्वबळावर लढू, असे जाहीर केले आहे.
यड्रावकरांनी कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे; पण ‘स्वाभिमानी’ला ही जागा सुटेल, अशी चिन्हे दिसू लागताच ‘जनसुराज्य’चे विनय कोरे यांनी यड्रावकरांची भेट घेऊन आपल्याकडे येण्याचा आग्रह धरला आहे. शिवाय नुकतेच काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत असल्याची घोषणा केलेल्या प्रकाश आवाडे यांनीही यड्रावकरांसाठी दारे खुली केली आहेत. इचलकरंजीबरोबरच हातकणंगले आणि शिरोळ लढविण्याची झालेली घोषणा हा या घडामोडींचाच परिपाक आहे.
दोन दिवसांत निर्णय
राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांनी ते कोल्हापुरात येणार आहेत. तेव्हाच ते शिरोळमधीलच उमेदवारीचा गुंता सोडविणार आहेत. दरम्यान, आघाडीकडून फसवणूक होईल, या भीतीने कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बुधवारी कोल्हापुरातील ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक झाली. भगवान काटे, जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, वैभव कांबळे, अजित पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘ए. वाय.’ यांना थांबविण्याच्या हालचाली
राधानगरी-भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याचा फैसला पुण्यात स्वत: शरद पवार उद्या, शनिवारी करणार आहेत. आगामी काळातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवूनच या दोघांमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न होणार आहेत. ए. वाय. पाटील यांना थांबण्यासाठीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.