राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर साधला निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:51 PM2019-09-02T14:51:45+5:302019-09-02T14:53:34+5:30
सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.
कोल्हापूर : सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.
कडकनाथ घोटाळ्याप्रश्नी मंत्री खोत यांनी कोल्हापुरात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कोंबडीचोर भामट्या मंत्र्याची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘सदाभाऊंना मंत्री करा म्हणून शिफारस केली ही आयुष्यातील सर्वांत मोठी घोडचूक होती, त्याची फळे आता आम्ही आणि शेतकरीही भोगत आहोत.’
कोल्हापुरात येऊन आमच्या विरोधात आकांडतांडव, आगपाखड करण्यापेक्षा ज्यांचे पैसे यात अडकले आहेत, त्या गोरगरीब शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी ताकद लावली असती, तर शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळाले असते, असेही शेट्टी यांनी सांगितले.