झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पाठीत लाथ घालून जागे करु, राजू शेट्टींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:50 AM2022-03-05T11:50:23+5:302022-03-05T11:51:05+5:30
आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज तर मागत आहे
कोल्हापूर : गेली अकरा दिवस शेतकरी महावितरण समोर बसला असताना प्रश्न मार्गी लागत नसेल तर आता राज्य सरकारचे दिवस भरले आहेत. राज्य सरकार जिवंत नसल्याने त्याची संवेदना संपली आहे. त्यामुळे शनिवारी सरकारचे बारावे घालणार असून, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारच्या पाठीत लाथ घालून जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.
शेट्टी म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात एका युवा शेतकऱ्याने वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी संयमाने रहावे. सरकारला सळो की पळो करून सोडू. आजपासून आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, राज्यभर याचे पडसाद उमटतील. राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे कसे करायचे, हे संघटनेला चांगलेच माहिती आहे. अजूनही जागे व्हा, अन्यथा तुमचे कपडे उतरवायला फार वेळ लागणार नाही.
१२ कार्यकर्ते मुंडन करणार
राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विधिवत पूजा करून सरकारचं बारावं महावितरणच्या कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता घातले जाणार आहे. बारा कार्यकर्ते मुंडन करून सरकारचा निषेध करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
आम्ही काय चंद्र, सूर्य मागतोय का?
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तिथे धरणे उभारली, त्यावर वीज निर्मिती करता. आम्ही काय सरकारकडे चंद्र, सूर्य मागतोय काय? दिवसा दहा तास वीज मागत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले