राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

By विश्वास पाटील | Published: July 20, 2024 01:31 PM2024-07-20T13:31:22+5:302024-07-20T13:31:46+5:30

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी ...

Raju Shetty Why are you showing the carrot of the third front again, Question by CPI(M) Party State Secretary Dr Uday Narkar | राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना शनिवारी विचारला.

शेट्टी यांनी विधानसभेत तिसरी आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नारकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे..त्यात ते म्हणतात, देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला आहे.

आज तिसऱ्या पर्यायाची भाषा करणारे सरळ सरळ भाजपच्या हिताचे राजकारण करत आहेत. २००९ मध्ये त्यावेळच्या रिडालोस या तिसऱ्या आघाडीच्या तिकिटावर शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातून  खासदार झाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत  शेट्टी यांनी इचलकरंजी मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार  दत्ता माने यांना मदत तर केली नाहीच, पण लाल बावट्याच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग कामगारांच्या लढ्यालाही कधी समर्थन दिले नाही. उलट ते २०१४ मध्ये भाजपच्या दावणीला आपखुशीने गेले. अशी संधिसाधू भूमिका घेणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी दिली नाही, म्हणून नक्राश्रू ढाळण्याची गरज नाही. आपले हित जोपासण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंबीर आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यास पक्षाने प्राधान्य दिले आणि ते साध्य करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

हातकणंगले मतदारसंघात 'मविआ'ची मते हवीत, मात्र त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत स्टेजवर येऊ नये, हा कसला बालहट्ट? तो कशासाठी होता हे तेथील निकालांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवायचे आणि प्रत्यक्षात भाजपला मदत करायची या नाटकाचा पहिला अंक सादर करण्यात आला. आता विधानसभेच्या निवडणुकीत त्याच नाटकाच्या दुसऱ्या अंकाची तालीम सुरू होत आहे. 

"धर्मांध गिधाडांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याची" घोषणा करत शरद जोशींपासून फारकत घेतलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांना परत त्या गिधाडांच्या हवाली करू पाहात आहेत. असे त्या गिधाडांच्या हवाली व्हायला शेतकरी आणि कामगार मेलेली जनावरे नाहीत, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहे. त्याचे दुसरे पाऊलही मराठी जनता आगामी विधानसभा निवडणुकीत उचलल्याशिवाय राहणार नाही.

भाजप-प्रणित महायुतीच्या विरोधातील सर्व लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांच्या एकजुटीचा विस्तार करत मविआ राज्यात परिवर्तन घडवून आणू शकेल. अशी एकजूट उभारण्यात माकप सतत सक्रिय राहील.

Web Title: Raju Shetty Why are you showing the carrot of the third front again, Question by CPI(M) Party State Secretary Dr Uday Narkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.