राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये समेट घडविणार
By admin | Published: June 12, 2017 11:44 PM2017-06-12T23:44:25+5:302017-06-12T23:44:25+5:30
राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये समेट घडविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदामुळे मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी या दोघांमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्य सरकारने रविवारी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत घोषणा केल्यानंतर सोमवारी राजू शेट्टी मुंबईहून मतदार संघात परतले. यावेळी पेठनाक्यावर महाडिक कुटुंबियांच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी राहुल महाडिक यांनी कोल्हापूर येथे जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली.
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी स्थापन करण्यात राहुल महाडिक यांचे मोठे योगदान होते. भाजपचे विक्रम पाटील केवळ भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार होते. त्यातच महाडिक युवा शक्तीनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांनी खासदार शेट्टी व खोत यांच्या सहकार्याने विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वांना एकत्र आणण्यात यश मिळविले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ३५ वर्षाच्या सत्तेला धक्का देत पालिकेवर विकास आघाडीची सत्ता आली.
खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकत्र असताना अनेक आंदोलने यशस्वी झाली आहेत. परंतु खोत यांना मंत्रीपद मिळाल्यापासून ते शेट्टींपासून दुरावले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. हे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आता राहुल महाडिक यांनी या दोघांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
महाडिकांची जिल्ह्यात ख्याती
नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक सध्या कोणत्याही पक्षात नाहीत. मात्र ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना खंबीर साथ देतात, अशी त्यांची ख्याती आहे. यापूर्वी सदाभाऊ खोत मंत्री झाल्यानंतर त्यांचा पेठनाक्यावर महाडिक संकुलात सत्कार करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिल्याबद्दल राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या दोघांमध्ये समेट घडविण्यासाठी महाडिक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.