कर्जमुक्तीचे आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टी
By admin | Published: April 4, 2017 05:07 PM2017-04-04T17:07:48+5:302017-04-04T17:07:48+5:30
२८ एप्रिलपासून ‘युवा आघाडी’चे जनजागृती रॅली,४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : गेले वर्षभर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘ऋणमुक्ती अभियान’ राबविले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर आंदोलनाची सरुवात करणार असून, संपूर्ण राज्यभर युवा आघाडीच्या माध्यमातून कर्जमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. तरीही सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करू; पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कर्जमुक्तीवरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली असून, सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आंदोलनाबाबत संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला तुळजापूर येथून ‘किसान ऋणमुक्ती अभियान’ संपूर्ण देशभर राबविले. त्याच्या माध्यमातून अनेक राज्यांत गेलो. कर्जबाजारी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे नाव, जमीन, जमिनीचा प्रकार, पीक कर्ज कोठून घेतले, थकीत किती, थकबाकी कशामुळे झाली, आदींची माहिती संकलित केली आहे. या महितीसह कर्जमुक्तीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून अर्ज घेतले आहेत. या आंदोलनाची राज्यपातळीवर व्याप्ती वाढविण्याचा निर्णय ‘स्वाभिमानी’च्या कार्यकारिणीने घेतला आहे.
२८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेला युवा आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात रॅली काढून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या रॅलीची सुरुवात २८ एप्रिलला शिरोळ येथून होणार असून ४ मे रोजी कोल्हापुरात सांगता होणार आहे. याच दिवशी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकारला जाग आणणार आहे. तोपर्यंत सरकारने कर्जमुक्तीबाबत पावले उचलली नाहीत तर ४ मे रोजीच तीव्र आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
या आहेत मोर्चातील मागण्या
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या.
स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा.
हंगाम २०१६-१७ मधील ३०० रुपये दुसरा हप्ता द्या.
भाऊंनी सरकार म्हणून निर्णय घ्यावा
कर्जमुक्ती आंदोलनात राज्यमंत्री सदाभाऊ खोत तुमच्याबरोबर उतरणार का? याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले, सदाभाऊ मंत्री असल्याने त्यांच्यावर आंदोलनाची मर्यादा आहे; पण त्यांनी सरकार म्हणून निर्णय घ्यावा. आम्ही रस्त्यावर उतरण्याचे काम करणार.