राजू शेट्टींची १७ ऑक्टोबरपासून ‘आत्मक्लेश पदयात्रा’: २२ दिवस ५२२ किलोमीटर चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:22 PM2023-10-03T12:22:27+5:302023-10-03T12:23:00+5:30
कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही
कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये दिल्याशिवाय कारखान्यांची धुराडे पेटू देणार नाही, असा गर्भित इशारा देत साखर कारखान्यांना दिलेली मुदत संपली असून, आता कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहे. या यात्रेची सांगता ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरातील ऊस परिषदेने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी म्हणाले, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून कारखानदारांना चारशे रुपये देण्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ती संपली असून, एकही कारखानदार बोलण्यास तयार नाही. गांधी जयंतीनिमित्त सोमवारी प्रत्येक कारखान्यावर जाऊन ढोलताशे वाजवून कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘आत्मक्लेश’ पदयात्रा काढणार आहे.
२२ वी ऊस परिषद आणि २२ दिवस पदयात्रा
‘स्वाभिमानी’ची यंदाची २२ वी ऊस परिषद आहे. त्यामुळे आत्मक्लेश पदयात्रेचे नियोजन २२ दिवस आणि ५२२ किलोमीटर केले आहे.
सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाही
या आंदोलनाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात असून, सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाही. त्याचाच भाग म्हणून ५ ऑक्टोबरला बेडकिहाळ येथे शेतकरी मेळावा, तर ९ ऑक्टोबरला कर्नाटक राज्य रयत संघटनेसोबत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.