शक्तीप्रदर्शनाने राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल : बैलगाडीतून रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:51 PM2019-03-28T17:51:21+5:302019-03-28T18:07:57+5:30
कॉँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्या दालनात दुपारी पावणे दोनच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार-पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी अर्जासोबत जोडलेली संपत्ती विवरणपत्र, प्रतिज्ञापत्र यासह अपेक्षित माहिती भरली आहे का? , नोंदणीकृत पक्ष असल्याने दहा सुचकांची नावे आहेत का? याची माहिती घेऊन अर्ज दाखल करुन घेतला. जवळपास अर्धा तास ही प्रक्रिया सुरु होती. यानंतर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनीही या मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन अर्ज दाखल करण्यासाठी खा. शेट्टी सजवलेल्या बैलगाडीतून रॅलीने निघाले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदीरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, भगवान काटे, सावकार मादनाईक, राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट, अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीचे योगेंद्र यादव, माकपचे नेते प्रा. उदय नारकर यांच्यासह महाआघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हलगी, कैताळाचा दणदणाट व खा. राजू शेट्टी यांच्या जयघोषात ही रॅली व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर या रॅलीचे रुपांतर नष्टे हॉल येथील सभेत झाले.