विनय कोरे लावणार फिल्डींग; उद्या ठरणार बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:14 PM2019-04-16T18:14:14+5:302019-04-16T18:33:39+5:30
जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठींबा कोणाला? याबाबत आज, बुधवारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे निर्णय जाहीर करणार आहेत .
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठींबा कोणाला? याबाबत आज, बुधवारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे निर्णय जाहीर करणार आहेत. महायुतीचा धर्म पाळायला तर विधानसभेची अडचण आहे, आघाडीसोबत जायचे म्हटले तर त्यांच्याशी कायम झुंजावे लागत असल्याने कोणी भूमिका घ्यायची अशी कोंडी झाली आहे.
विनय कोरे यांची पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यात स्वताचे गट आहेत. त्यांच्याकडे सहा जिल्हा परिषदेचे सदस्य, पाच बाजार समितीचे संचालक, पंचायत समिती सदस्य, वारणा कारखाना व दूध संघाचे संचालक असे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्या बळावरच ते जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करू शकले. राज्याच्या राजकारणात ते भाजप महायुतीसोबत असले तरी आता कोणाला पाठींबा द्यायचा यावरून ते व्दिधा मनस्थितीत आहेत. युतीला पाठींबा द्यायचा म्हटला तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सत्यजीत पाटील-सरूडकर हे धैर्यशील माने यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सोबत जाऊन ‘धनुष्यबाणाचा प्रचार करायचा आणि चार महिन्यांनी विधानसभेला काय सांगायचे? असे त्रागंडे विनय कोरे यांच्या समोर आहे. त्यामुळे ‘हातकणंगले’चा निर्णय अद्याप राखून ठेवला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेट्टींसाठी बॅटींग सुरू केल्याचे दिसते.
दरम्यान, आज, सायंकाळी सहा वाजता वारणा दूध संघाच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून विनय कोरे हे भूमिका जाहीर करणार आहेत.
‘जनसुराज्य’चा गुलाल मंडलिकांच्या माथी?
कोल्हापूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचा गुलाल शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या माथी लावला जाण्याची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे.