Raju Shetty: राजू शेट्टींची पदयात्रा आज नृसिंहवाडीत येणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त, रेस्क्यू फोर्सला पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:04 AM2021-09-05T09:04:39+5:302021-09-05T09:05:21+5:30
पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत.
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा पूरग्रस्तांना न्याय द्या या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून काढलेली पदयात्रा आज नृसिंहवाडीत पोहचणार आहे. नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार अशी घोषणा केल्यामुळे प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. दि. 1 सप्टेंबर पासून प्रयाग चिखली येथे या पंचगंगा नदीच्या परिक्रमा पदयात्रेची सुरूवात केली असून 4 दिवसात ९० किमीचे अंतर कापून अब्दुललाट येथे काल रात्री उशीरा ही पदयात्रा पोहचली आहे.
पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत. आज दुपारी 3 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन होणार आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्या-
१) २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकर्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा.
२) पूरग्रस्तांचे मागणीप्रमाणे सोयीचे पुनवर्सन करा.
३) कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा.
४) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.
५) २००५ ते २०२१ पर्यंत ४ मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठचे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी.
६) महापुरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहीरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडकळून पडल्या आहेत. यंत्रमागधारकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना सरकारने तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी.
७) महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे. त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावे.