राजू शेट्टींचा 'आक्रोश'; ४०० रुपयांच्या मागणीला मिळणार यश 

By भीमगोंड देसाई | Published: October 26, 2023 04:37 PM2023-10-26T16:37:34+5:302023-10-26T16:38:11+5:30

शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य मंडप उभारून जेवणाची व्यवस्था केली

Raju Shetty's protest march will give success to the demand of Rs 400 for the second installment of sugarcane | राजू शेट्टींचा 'आक्रोश'; ४०० रुपयांच्या मागणीला मिळणार यश 

छाया-आदित्य वेल्हाळ

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : मुक्कामाच्या ठिकाणीच चहा, नाश्ता करून सकाळी सात वाजता आक्रोश पदयात्रा निघते. यात्रा पुढे, पुढे जाईल तशी गर्दी वाढत जाते. एका गावातून दुसऱ्या गावात पोहचताच तिथे माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव होतो. धनगरी ढोल वाजवले जातात. फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून औक्षण होते. असे चित्र बुधवारी पन्हाळा तालुक्यातील माेहरे, आरळे, सातवे गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेत पाहायला मिळाले. उसाला तीन हजार रुपयांपर्यंत दर राजू शेट्टी यांच्यामुळेच मिळाला. आता ४०० रुपयेही त्यांच्या लढ्यामुळेच मिळणार म्हणून आम्ही यात्रेत पदरमोड करून सहभागी झालो अशा भावाना मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

शिरोळ येथून सुरू झालेली शेट्टी यांची पदयात्रा नवव्या दिवशी पन्हाळा तालुक्यात पोहोचली. मंगळवारी रात्री वारणा कोडोली येथे मुक्काम करून सकाळी सात वाजता तेथून निघाली. वारणेचा खोरा असूनही गावागावात यात्रेचे जल्लोषात स्वागत होत राहिले. गाव सोडल्यानंतर शेतात काम करणारे शेतकरीही रस्त्यावर येऊन यात्रेचे स्वागत करीत होते. मोहरेत यात्रा आली. ग्रामस्थांनी यात्रेतील शेतकऱ्यांना सरबत, पाण्याच्या बाटल्या दिल्या. सभा झाली. ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडायचे नाही, आता मागे हटायचे नाही, असा संदेश सभेत शेट्टी यांनी देताच यात्रेतील आणि सभेतील शेतकऱ्यांत जोम संचारला. तेथून यात्रा मार्गस्थ झाली. थोडे अंतर चालल्यानंतर वाढलेले वय आणि चालून थकवा आल्याने शेट्टी यांच्या पायाची गती मंदावली. रस्त्याच्या कडेला एका झाडाखालीच ते आडवे झाले.

आरळे गावातून सातवे येथे दुपारी दीडच्या सुमारास यात्रा पोहोचली. येथे शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य मंडप उभारून जेवणाची व्यवस्था केली. यात्रेतील सर्व शेतकऱ्यांना गावातील तरुण, युवक, शेतकऱ्यांनी दही, खर्डा, भाकरी, भात आग्रहाने जेऊ घातले. शेतकऱ्यांनी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन सावलीला विश्रांती घेतली. शेट्टी यांनीही कार्यकर्त्याची घरी थांबून सुजलेल्या पायाला, फोडांना औषधी लावून घेतली. रक्तदाब, मधुमेहाची गोळी घेतली. थोडा वेळ विश्रांती घेऊन दुपारी चारला पुन्हा सावर्डेच्या दिशेने यात्रा मार्गस्थ झाली. तेथून थेरगावातून शाहूवाडी तालुक्यातील चरण येथे मुक्कामाला पोहोचली.

चालणाऱ्या पायांची पूजा

मोहरे गावातील रमेश जगदाळे या शेतकऱ्याने पदयात्रेतून शेट्टी यांना आग्रहाने घरी नेले. पाय परातीमध्ये ठेवून त्याची पूजा करून औक्षण केले. यावर भावनिक होऊन शेट्टी असे काही करू नको, असे सांगितले. त्यावेळी रमेश यांनी तुमची नाही तर इतके किलोमीटर चालणाऱ्या पायांची पूजा केली आहे. यात काहीही गैर वाटून घेऊ नका, असे सांगितले.

पदयात्रेमुळे शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागृती झाली आहे. यामुळे ४०० रुपये कारखानदारांना द्यावेच लागतील. शेट्टी यांच्या लढ्यामुळेच दुसरा हप्ताही मिळणार असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पक्ष, गट तट विसरून शेतकरी यात्रेत सहभागी होत आहेत. - विजय सावंत, शेतकरी, सातवे, ता.पन्हाळा
 

यात्रेच्या पहिल्या दिवसापासून आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाईल तशी गर्दी वाढतच आहे. शेतकऱ्यांमध्ये केवळ शेट्टीच उसाला दर मिळवून देतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. - बाळासाहेब माने, हरोली, ता. शिरोळ

Web Title: Raju Shetty's protest march will give success to the demand of Rs 400 for the second installment of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.