बंदी जुगारुन आमचे कार्य करत राहू, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 02:14 PM2023-05-02T14:14:00+5:302023-05-02T14:15:07+5:30
कुणाचीतरी सुपारी घेवून काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस आणि राज्य सरकार करीत आहे
संदीप बावचे
जयसिंगपूर : कुणाचीतरी सुपारी घेवून काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस आणि राज्य सरकार करीत आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रत्नागिरीत यायला बंदी का घातली, हे विचारणार आहे. लोकशाहीचा गळा घोटून तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही संविधानाला अधिन राहून काम करणारे असून या बंद्या जुगारुन आम्ही आमचे काम करत राहू असा इशारा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
जिल्हा बंदी घालावी असे काही कृत्य मी केले नाही. रत्नागिरीतील बारसू प्रकल्पग्रस्तांनी मला मदतीची हात दिली. त्यांची बाजू योग्य आहे. २०१३ च्या भूमि अधिग्रहण कायद्यानुसार कोणाही शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येणार नाही. त्यामुळेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन मला माझी जमीन द्यायची नाही, ही भूमिका घेणाऱ्या बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू मी घेतली.
वेळप्रसंग पडला तर आंदोलनाची तयारी ठेवा असे सांगून वेळोवेळी त्यांची बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडत राहिलो. त्यांच्या मदतीसाठी काही सहकाऱ्यांना त्याठिकाणी पाठविले. त्याचं भांडवल करुन रत्नागिरी पोलिसांनी मला ३१ मे पर्यंत जिल्हाबंदी घातली आहे. शिवाय सोशल मीडियावर बारसू प्रकल्पाविषयी काही लिहायचं नाही, बोलायचं नाही, चित्रफित टाकायचं नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार
संविधानाने मला मुलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यावर निर्बंध आणले आहेत. म्हणून मी गप्प बसणार नाही. लोकसभा, विधानसभा सभागृहात मी संविधानाच्या कोणत्याही चौकटीचा भंग केलेला नाही. त्यामुळे अशाप्रकारचे निर्बंध माझ्यावर लादणे हा अन्याय आहे. कुणाचीतरी सुपारी घेवून काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस एकूण राज्य सरकार करीत आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रत्नागिरीत यायला बंदी का घातली, हे विचारणार आहे.
मी काय आतंकवादी, नक्षलवादी आहे काय?
शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून देशभर फिरतो. काश्मिरमध्येही जातो पण त्या सरकारने मला बंदी घातली नाही. त्यामुळे रत्नागिरीमध्ये असं काय घडलय, मी काय आतंकवादी, नक्षलवादी आहे काय? लोकशाहीचा गळा घोटून तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही संविधानाला अधिन राहून काम करणारे असून या बंद्या जुगारुन आम्ही आमचे काम करत राहू असा इशारा शेट्टी यांनी दिला.