राजू शेट्टी यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:15 AM2019-04-25T00:15:00+5:302019-04-25T00:15:06+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणतीही तडजोड न करता, सातत्याने संघर्ष, शेतकऱ्यांचा नेता अशी देशभर प्रतिमा निर्माण झाली असतानाही खासदार ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणतीही तडजोड न करता, सातत्याने संघर्ष, शेतकऱ्यांचा नेता अशी देशभर प्रतिमा निर्माण झाली असतानाही खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत जातीय राजकारण व बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे निर्माण झालेल्या नाराजीला सामोरे जावे लागले. त्यांचा शेतकºयांसाठीचा लढा त्या तुलनेत बाजूला पडल्याचे चित्र प्रचारात तरी दिसले. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी पहिल्यांदा रिंगणात उतरूनही शेट्टी यांना चांगलेच आव्हान दिले. इचलकरंजी मतदारसंघातील लीड व वंचित आघाडी घेणारी संभाव्य मते या गृहितकावर आपण विजयी होऊ शकतो, असे माने यांना वाटते.
गेल्या निवडणुकीत सर्व सहाही मतदारसंघांत शेट्टी यांना मताधिक्य होते. या निवडणुकीत शिरोळ मतदारसंघात विधानसभेप्रमाणे मराठा कार्ड बाहेर निघाले; त्यामुळेही माने हेच निवडून येतील, अशी हवा मुख्यत: मतदारसंघाबाहेर जास्त तयार झाली आहे. कोल्हापूर शहराजवळील एका स्वामींनीही शेट्टींविरोधात अंतर्गत फिल्डिंंग लावली. आजपर्यंत तुम्ही ज्यांना चोर (राष्ट्रवादी व साखर कारखानदार) म्हणत होता, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसता? हा विरोधकांनी केलेला प्रचारही शेट्टी यांच्या अंगावर आला; परंतु तरीही इचलकरंजी वगळता अन्य मतदारसंघात कमी झाले तरी शेट्टी यांनाच मताधिक्य मिळण्याची चिन्हे आहेत. जातीचे कार्ड दीड मतदारसंघात चालले. शिरोळ, शिराळा, इस्लामपूर, शाहूवाडी मतदारसंघांत शेट्टी यांना चांगले मतदान झाल्याचे चित्र आहे. पन्हाळ्यात विनय कोरे यांच्या जनसुराज्यने बॅट हातात घेतल्याचा फायदाही शेट्टी यांना होऊ शकतो. यावरही ‘शेतकºयांच्या प्रश्नांसाठी झगडणारा नेता’ निवडून आला पाहिजे, ही बांधीलकी मानणारा सामान्य शेतकरीवर्गही मोठा आहे. तो शेट्टी यांची जातपात पाहत नाही. त्या मतांवर आपण निवडून येऊ शकतो, असा दावा शेट्टी यांच्याकडून केला जात आहे. शेट्टी यांच्या मागील दोन्ही निवडणुकीत विरोधातील उमेदवार तितके प्रभावी नव्हते. पहिल्या २००९ च्या लढतीत निवेदिता माने यांच्याबद्दल नाराजी होती. गेल्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पाच वर्षे मतदारसंघांशी कोणताच संपर्क नव्हता, अचानक ते मैदानात उतरल्याने शेट्टी सहज विजयी झाले होते. उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत भाजपकडून रिंगणात उतरले असते, तरी ते चळवळ मोडायला उठलेत म्हणून शेट्टी यांना सहानुभूती मिळाली असती; परंतु धैर्यशील माने यांची पाटी कोरी असल्याने त्यांच्याबद्दल नकारात्मक काहीच नव्हते. शिवसेनेची उमेदवारी, तरुण उमेदवार व प्रभावी वक्तृत्व यांमुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यात ते यशस्वी ठरले. या मतदारसंघात सहापैकी पाच आमदार युतीचे होते, त्यांची एकजूटही माने यांच्यामागे राहिली.
वंचित आघाडीच्या मतदानांवर भवितव्य!
मोदी यांना घरी बसवा, असे आवाहन करणारे शेट्टी हे या देशातील पहिले नेते आहेत; त्यामुळे त्यांच्याविरोधात पारंपरिक भाजप मतदारांत कमालीची नाराजी होती. इचलकरंजी मतदारसंघात शेट्टी यांना जो विरोध झाला, त्याचे खरे कारण हे आहे. भाजपने त्यांच्याविरोधात ताकद लावण्यामागेही हेच कारण आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेले वक्तव्यही आगीत तेल ओतणारे ठरले. त्यातच इचलकरंजीत शेट्टी यांनी पाणीप्रश्नांस विरोध केल्याचे चित्र तयार झाले; त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात ते मागे पडणार हे स्पष्टच आहे. वंचित आघाडीचे अस्लम सय्यद हे किती मते घेतात, याकडेही सर्वांचेच लक्ष आहे. त्यांच्यामागील मुस्लिम मते मात्र शेट्टी यांच्याकडे वळल्याचे सांगण्यात येते. वाळव्यातील महाडिक गट शिवसेनेच्याच मागे राहिला.