कोल्हापूरच्या राख्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:36 PM2020-08-01T17:36:42+5:302020-08-01T17:39:50+5:30
सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले.
कोल्हापूर : देशासाठी अहोरात्र सजग असलेल्या तमाम सैनिकांचा आत्मविश्वास वाढविण्याची ताकद कोल्हापुरातून पाठविल्या जात असलेल्या तमाम भगिनींच्या राख्यांमध्ये आहे. त्यामुळेच सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले.
येथील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कारगील युद्धापासुन एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम यंदा प्रतीकात्मक स्वरुपात पार पडला.
जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातील युवती, बचतगटांच्या महिला या उपक्रमात सहभागी होत असून मुल्य शिक्षणाचा भाग म्हणून गोवा राज्यासह विविध जिल्ह्यात यांचे अनुकरण होत असल्याचे प्रारंभी सचिव राजेंद्र मकोटे यांनी सांगितले.
या सैनिकासाठी राखी उपक्रमांर्तगत जमा होणा-या लाखो राख्या प्रतिवर्षी थेट सीमेवर पाठवल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूपामध्ये घेतलेला हा कार्यक्रम आगामी आगामी काळात व्यापकपणे करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी सांगितले.
जिल्हा माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर एम.एन.पाटील सांगवडेकर म्हणाले, हा उपक्रम आजी माजी सैनिकांसाठी लाख मोलाचा आहे. उपजिल्हा सैनिक अधिकारी चंद्रशेखर पागे, डाँ.सायली कचरे, श्रेयस भगवान यांनी ही मनोगते व्यक्त केली.
यावेळी रोटरी स्मार्टसिटीवतीने विवेकानंद ट्रस्टला मानसिंग पानसकर , शामराव घोरपडे , सुरेश सुतार , सुरेश खांडेकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
सुनीता मेंगाणे, आनिता काळे, यशश्री घाटगे, सुलोचना नारवेकर, आदिती - ,रेवती घाटगे यांनी राख्या बांधल्या. आभार कमलाकर किलकिले यांनी मानले. यावेळी सदस्य मालोजी केरकर , प्रशांत बरगे , सुखदेव गिरी, महेश कामत , रविराज कांबळे यांच्यासह आदर्श प्रशाला, चाटे स्कूल , कन्या विद्यालय कळंबा येथील शिक्षक उपस्थित होते.