पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:14+5:302021-08-23T04:25:14+5:30
कोल्हापूर : भावा-बहिणीच्या नात्यातील मायेची वीण घट्ट करीत रविवारी सर्वत्र राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळपासूनच लख्ख उन्ह ...
कोल्हापूर : भावा-बहिणीच्या नात्यातील मायेची वीण घट्ट करीत रविवारी सर्वत्र राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळपासूनच लख्ख उन्ह पडल्याने सणाचा उत्साह अपूर्व हाेता. तरीसुद्धा कोरोनापासून सावधगिरी बाळगत अनेकांनी सणाचा आनंद लुटला.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा आणखी घट्ट व्हावा, नात्यातील मायेचे बंध अधिक घट्ट व्हावेत याकरिता हिंदू संस्कृतीप्रमाणे या सणाला अद्वितीय महत्त्व आहे. त्यामुळे रविवारी मोठा उत्साह सर्वत्र होता. सार्वजनिक सुटीचा वार रविवार असल्यामुळे घराघरामध्ये गोडधोड करण्याची लगबग सुरू होती. सकाळी दारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. लहानग्यांचा उत्साह तर अपूर्व होता. केव्हा एकदा बहीण आपल्या हातावर राखी बांधते याची उत्कंठा अनेक भावांना लागली होती. बहिणीने भावांना हातात राखी बांधून औक्षण केल्यानंतर भाऊराया हातातील नाजूक नक्षीकाम असलेली राखी सर्वत्र हातावर बांधून मिरवीत होते. अनेकांना ही आकर्षक राखी दाखवितानाचे हे चित्र सर्वत्र होते.
कोरोनाची सलग दुसरी लाट येऊन गेल्यामुळे अनेक बहिणींनी कुरिअर, पोस्टाचा आधार घेत परगावी असणाऱ्या भावांना राख्या पाठविल्या. रविवारी सकाळपासूनच संदेश अथवा फाेन करून ती मिळाली का अशी विचारणाही करणे सुरू होते. माहेर अथवा सासरी भावाला बोलावून गोडधोड जेवणाचा बेत आखून त्याचे औक्षण करून बहिणी आपल्या भावाला राखी बांधत होत्या.
पंचपक्वानांसह गोडधोड बेत
घराघरांमध्ये पंचपक्वान्नांचा बेत आखण्यात आला होता. विशेष म्हणजे श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, चक्का, बासुंदी, जिलेबी, खाजा,
या पदार्थांना मागणी अधिक होती. अनेक बेकरी, डेअरीमध्ये दिवसभर खरेदीसाठी गर्दी होती. शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी आदी ठिकाणी खरेदीसाठीही गर्दी होती.
सोशल मीडियावर संदेशांचा पाऊस
दिवसभर पावसाची रिपरिप अल्प असली तरी व्हाॅटस्ॲप, स्टेटस, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर बहीण भावाला ओवाळतानाचे व नाजूक राख्यांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली होती. याशिवाय संदेशांचा मध्यरात्री बारापासून अक्षरश: पाऊस पडत होता. संदेशाची देवाणघेवाण उशिरा रात्रीपर्यंत सर्वत्र मोबाइलवर सुरू होती.
फोटो : २२०८२०२१-कोल-राखी पौर्णिमा ०१, ०२
ओळी : भावा-बहिणीतील अतूट मायेचे बंध जपणाऱ्या पवित्र सणादिवशी रविवारी या लहानग्या भावा-बहिणीही आपल्या नात्यातील मायेचे बंध राखी बांधून घट्ट केले.
(छाया : नसीर अत्तार)