रॅलीने रणरागिणींची एकजूट

By admin | Published: October 10, 2016 12:59 AM2016-10-10T00:59:18+5:302016-10-10T00:59:18+5:30

राजारामपुरी, शाहूपुरीत जनजागृती : सात हजार मराठा बांधव सहभागी

Rallies unite the Ranaragini | रॅलीने रणरागिणींची एकजूट

रॅलीने रणरागिणींची एकजूट

Next

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचार-प्रसारासाठी राजारामपुरी व शाहूपुरीतील सकल मराठा समाजातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने रणरागिणींनी सहभाग नोंदवून मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला. रॅलीमध्ये सुमारे सात हजार सकल मराठा समाजातील महिला व बांधव सहभागी झाले होते.
कोपर्डीतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, अट्रॉसिटी कायद्यात बदल, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आदी मागण्यांसाठी शनिवारी निघणाऱ्या सकल मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे म्हणून ही मोटारसायकल रॅली काढली. राजारामपुरीतील नऊ नंबरच्या शाळेच्या मैदान येथून रविवारी सकाळी अकरा वाजता रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी घोड्यावर स्वार होऊन प्राजक्ता बागल ही तरुणी सहभागी झाली होती. तिच्यापाठापोठ महिला व तरुणी दुचाकी घेऊन सहभागी झाल्या. त्यांच्या पाठोपाठ पुरुष व युवक भगवे ध्वज घेऊन व डोक्यावर ‘मी मराठा’ अशी टोपी घालून सहभागी झाले होते. रॅलीचे एक टोक राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत तर शेवटची व्यक्ती बाराव्या गल्लीतील मारुती मंदिराजवळ होती.
घोड्यावर स्वार प्राजक्ताने वेधले लक्ष..
जनजागृती मोटारसायकल रॅलीमध्ये घोड्यावर स्वार होऊन प्राजक्ता बागल ही सहभागी झाली होत्या. रॅलीच्या अग्रभागी प्राजक्ता होती. प्राजक्ताचा फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केलीच पण काही ठिकाणी चौका-चौकांत महिलांनी तिचे औक्षण केले.

मोर्चाची पंतप्रधानांनी घेतली दखल : धनंजय महाडिक
कोल्हापूर : राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे सांगितले.
सानेगुरुजी वसाहत परिसरातील रावजी मंगल कार्यालय येथे मोर्चाच्या तयारीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, नगरसेवक राजू दिंडोर्ले, संभाजी जाधव, नगरसेविका मनिषा कुंभार, अमोल पालोजी, आर. डी. पाटील, आदी उपस्थित होते.
खासदार महाडिक म्हणाले, दिल्ली येथे सिंगापूरच्या पंतप्रधानांसाठी आयोजित मेजवानीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपला संवाद झाला. यावेळी त्यांनीही या मोर्चाची नोंद घेतली. मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत देण्यासाठी शासनाने राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी. मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणासाठी गरज व्यक्त केली. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे. आमदार अमल महाडिक म्हणाले, कोणत्याही प्रकारचे गालबोट न लावता शिस्तबद्ध आणि शांततेत १५ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करूया. यावेळी परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
संयुक्त जुना बुधवार पेठेची रॅली
कोल्हापूर : मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त जुना बुधवार पेठेतर्फे रविवारी शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
जुना बुधवार पेठेतील तोरस्कर चौकातून सकाळी या दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. भगवे फेटे आणि ध्वज घेऊन तरुण मोठ्या प्रमाणात आले होते. दसरा चौक, बिंदू चौक, दिलबहार तालीम, मिरजकर तिकटी, शाहू बँक, नंगीवली तालीम चौक, नाथा गोळे तालीम, खरी कॉर्नर, पापाची तिकटीमार्गे शिवाजी पुतळा येथे आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ या ब्रीदवाक्याच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ही रॅली पापाची तिकटीमार्गे जुना बुधवार पेठ तालीम येथे विसर्जित करण्यात आली. रॅलीत जुना बुधवार पेठेतील नागरिकांसह तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

नेत्यांकडून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांची कानउघाडणी
कोल्हापूर : नगरपालिकेत नगरसेवक अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी घेऊन रविवारी सायंकाळी आघाडीच्या नगरसेवकांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काही ‘कारभारी’ नगरसेवकांची कानउघाडणी केली.
पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्य आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्ती व राजीनाम्याचा मार्ग पत्करला आहे.
चार दिवसांपूर्वी प्रभाग समिती बैठकीवरून सहायक आयुक्त सचिन खाडे आणि माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्यातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. गवंडी यांना अटक झाली. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी आमदार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत, त्यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. काही ‘कारभारी’ नगरसेवकांच्या या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे आघाडी बदनाम होत असल्याची व्यथा काही नगरसेवकांनी नेत्यांकडे मांडली. काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला असताना नेत्यांनी अधिकाऱ्यांची बाजू घेत ‘प्रथम तुमची कार्यपद्धती सुधारा, अधिकाऱ्यांशी वाद घालू नका, त्यांच्याशी गोडीगुलाबीने बोलून कामे करून घ्या’ असा सल्ला देत काही नगरसेवकांची कानउघाडणी केली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे पती, नातेवाईक उपस्थित होते.
नेत्यांची नाराजी
सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी मोर्चा काढण्याचा इशारा देऊनही या मोर्चासाठी नगरसेवक फिरकले नसल्याबाबत आमदार मुश्रीफ यांनी नगरसेवकांचा ‘शेलक्या’ शब्दांत समाचार घेतला. त्यामुळे बैठकीनंतर सर्व नगरसेवकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे गाठून खाडे यांच्या अटकेची मागणी केली.
 

Web Title: Rallies unite the Ranaragini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.