काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: August 6, 2015 11:49 PM2015-08-06T23:49:13+5:302015-08-06T23:49:13+5:30
खासदारांचे निलंबन मागे घ्या : सरकार गरिबांचे नव्हे : पी. एन. पाटील
कोल्हापूर : ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागणाऱ्या लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे झालेले निलंबन मागे घ्या, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावर आली. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.दुपारी स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू सुबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पी. एन. पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टीका करीत चांगलाच समाचार घेतला. खासदारांच्या निलंबनाची कारवाई ही देशाच्या इतिहासातील पहिलीच कारवाई आहे. भाजप सरकार हे सर्वसामान्य व गोरगरिबांचे सरकार नाही. कारण संजय गांधी निराधार योजना बंद करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. अॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले.मेळाव्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. भर पावसातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, हिंदुराव चौगले, प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, अंजना रेडेकर, उदयानी साळुंखे, संध्या घोटणे, आदी सहभागी झाले होते.