मोर्चासाठी गांधी मैदानासह पेटाळा, ‘महाराष्ट्र’चेही पटांगण
By admin | Published: September 25, 2016 01:29 AM2016-09-25T01:29:45+5:302016-09-25T01:29:45+5:30
सकल मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे आज उद्घाटन
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या १५ आॅक्टोबरला कोल्हापुरातील मूक मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता, गांधी मैदानासह पद्माराजे हायस्कूल मैदान (पेटाळा) व महाराष्ट्र हायस्कूलचे पटांगणही मोर्चासाठी घेण्यात येणार आहे. तसा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे सकल मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. जनजागृतीसाठी मेळावे, बैठका होत आहेत.
मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, कोपर्डी अत्याचारप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, यासह विविध मागण्यांसाठी १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात काढण्यात येणाऱ्या महामूकमोर्चात सुमारे १५ लाख मराठा समाजबांधवांसह रस्त्यावर येण्याचा वज्रनिर्धार कोल्हापुरातील मराठा बांधवांनी केला आहे. सीमाभागातूनही लोक यात सहभागी होणार असल्याने उच्चांकी गर्दी होणार आहे. त्यामुळे मोर्चासाठी निवडलेली गांधी मैदान ही जागा अपुरी पडणार असल्याने शेजारील पद्माराजे हायस्कूल मैदान (पेटाळा) व महाराष्ट्र हायस्कूलचे पटांगण मोर्चासाठी घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. आंदोलनात सहभागी होणारे पुरुष हे गांधी मैदानावर, महिला पेटाळा मैदानावर, तर विद्यार्थी महाराष्ट्र हायस्कूलच्या पटांगणावर एकत्र येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे गांधी मैदानावरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा समितीच्या माध्यमातून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मेळावे, बैठका घेऊन मराठा बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. आज, रविवारी दुपारी एक वाजता हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्याचबरोबर समितीच्या माध्यमातून दिवसभरात पाचगाव, कळंबा, फुलेवाडी, आदी ठिकाणी बैठका घेऊन मराठा समाजबांधवांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता कार्यालयात मंगळवार पेठेतील तालीम संस्था, तरुण मंडळे, महिला मंडळ, बचत गटांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्याचबरोबर या क्रांती मोर्चासाठी प्रत्येक तालुक्यातील, शहरातील मराठा बांधवांना तसेच संस्था व संघटनांना संपर्क साधता यावा यासाठी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज, रविवारी सकाळी ११ वाजता मराठा समाजातील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते होणार आहे. (प्रतिनिधी)