मराठा क्रांती महामोर्चासाठी कोल्हापूरात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 06:15 PM2017-08-06T18:15:13+5:302017-08-08T11:18:14+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... राजर्षी शाहू महाराज की जय... एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी (दि. ९) निघणाºया मराठा महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा मावळा व रणरागिणींच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून या मोर्चात कोल्हापूरकरांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... राजर्षी शाहू महाराज की जय... एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी (दि. ९) निघणाºया मराठा महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा मावळा व रणरागिणींच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून या मोर्चात कोल्हापूरकरांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.
सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे संदीप पाटील यांनी मराठा मावळ्यांना शिस्तबद्ध रॅली काढून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ दिली. त्यानंतर छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांच्या पुतळ्यांचे पूजन होऊन रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या पुढे छत्रपती शंभूराजे यांचा खुल्या जीपवर बसविण्यात आलेला पुतळा, तर त्या पाठीमागे मोटारसायकलवर असलेले मराठा मावळे व रणरागिणी होत्या. सर्वांत शेवटी छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा असलेले चारचाकी वाहन होते.
हातात भगवे ध्वज व डोक्यावर मराठा लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले मराठा मावळे व रणरागिणी यांची ही रॅली राष्टÑमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे व राजर्षी शाहू यांच्यासह ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत शहरातून निघाली. ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली पाहण्यासाठी अवघे शहर रस्त्यावर आले होते. चौकाचौकांत या रॅलीमध्ये मराठा बांधव सहभागी होत होते.
दरम्यान, निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी पुतळा, दसरा चौकातील शाहू पुतळा, ताराराणी चौकातील महाराणी ताराराणींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅलीतील मराठा मावळे व रणरागिणींच्या घोषणांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. रॅलीतून मराठा एकजुटीचा संदेश देत मुंबर्ईतील मराठा महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती करून शिवाजी चौक येथे आल्यानंतर या रॅलीची सांगता झाली. यावेळी मराठा मावळ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईचा मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
‘शिवानीं’चा आवाज बुलंद
‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत रॅलीतून शिवानी शिंदे व शिवानी जाधव या रणरागिणींनी सकल मराठ्यांचा आवाज बुलंद केला. या रणरागिणींच्या आवेश आणि उत्साहाने रॅलीतील वातावरण द्विगुणित झाले.
प्रमुख शिलेदार....
राजू सावंत, जयेश कदम, शाहीर दिलीप सावंत, श्रीकांत भोसले, फत्तेसिंह सावंत, संदीप पाटील, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, संग्रामसिंह निकम, सुरेश जरग, संपतराव चव्हाण-पाटील, उदय जगताप, संग्रामसिंह गायकवाड, किशोर घाटगे, शिवानी जाधव, शिवानी शिंदे, संग्राम निकम, फिरोज उस्ताद, हृषीकेश तोरस्कर, विनय कोरवी, स्वप्निल जाधव, श्रीनिवास नारंगीकर, अमर पाटील, नंदू झेंडे, महेश बी. पाटील, गणी आजरेकर, राजू लिंग्रज, वसंतराव मेथे, शिरीष जाधव, अमरसिंह दळवी, प्रवीण राजगिरे, आशुतोष खराडे, सत्यजित पाटील, प्रथमेश देवकर, विश्वास कार्वेकर, अभिषेक पाटील, नागेश पोवार यांच्यासह सकल मराठा मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिस्तबद्ध रॅली अन् मराठा मावळ्यांचा उत्साह
शिवाजी मंदिर येथून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली अर्धा शिवाजी पुतळा, कोल्हापूर हायस्कूल, खरी कॉर्नर, पद्माराजे हायस्कूल, नाथा गोळे तालीम, नंगीवाली तालीम, शाहू बँक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गवळी गल्ली, भगतसिंग तरुण मंडळ, टाऊन हॉल उद्यान, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, दाभोळकर चौक, ताराराणी चौक, स्टार बझार, टाकाळा, कमला कॉलेज, राजारामपुरी बसस्टॉप, १२वी गल्ली, मेन रोड, जनता बाजार, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा चित्रमंदिर, सुभाष रोड, अयोध्या चित्रमंदिर, बिंदू चौक मार्गे शिवाजी महाराज चौक येथे येऊन सांगता झाली.
रॅलीमध्ये मोठ्या संख्यने सकल मराठा समाज सहभागी होऊनसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली. यात सहभागी मराठा मावळ्यांच्या उत्साह दिसून येत होता.