मुस्लीम बांधवांची परंपरागत पद्धतीने रमजान ईद; देशाची एकात्मता, सुख, शांती अबाधित राहावी यासाठी केली प्रार्थना
By संदीप आडनाईक | Published: April 22, 2023 07:00 PM2023-04-22T19:00:22+5:302023-04-22T19:01:05+5:30
मुस्लीम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर रमजान ईदची नमाज पठण
कोल्हापूर : मुस्लीम बांधवांचा रमजान ईद (ईद-उल-फित्र) शनिवारी मोठ्या उत्साहात सर्वधर्मीयांनी मिळून साजरा केला. प्रतिवर्षीप्रमाणे परंपरागत पद्धतीने मुस्लीम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली. नमाज पठणदरम्यान सर्वांनी मिळून कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता आणि सुख, शांती अबाधित राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना इतर सर्वच समाजांतील लोकांनी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापुरात हिंदू-मुस्लीम भाई-भाई ही भावना कायमच कृतीतून जोपासली जाते, त्याचेच प्रत्यंतर शनिवारीही पुन्हा आले. ईद हा सण मुस्लीम बांधवांचा असला तरी मित्र परिवारांना शिरखुर्म्याचे वाटप झाले. अक्षय तृतीयाचे गोडधोड घरी खाऊन सायंकाळी अनेकांनी मुस्लीम मित्रांच्या घरी जाऊन बिर्याणीचा आस्वाद घेतला.
पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशात कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि नमाज पठण केले. दुसऱ्या जमातच्या नमाजकरिता हाफीज अकिब म्हालदार आणि तिसऱ्या जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले.
यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती, मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटक धाेंड, रणजित पोवार, बापू मुल्ला उपस्थित होते. स्वागत संस्थेचे प्रशासक कादर मलबारी यांनी केले. चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले.
शिरखुर्म्याचे वाटप
याप्रसंगी मुस्लीम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारुख पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.