उद्याच साजरी होणार रमजान ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:33+5:302021-05-13T04:25:33+5:30
कोल्हापूर : बुधवारी कोल्हापुरात चंद्र दर्शन झाले नसल्याने रमजान ईद ठरल्याप्रमाणे उद्या शुक्रवारीच साजरी होणार आहे. हिलाल कमिटीने देखील ...
कोल्हापूर : बुधवारी कोल्हापुरात चंद्र दर्शन झाले नसल्याने रमजान ईद ठरल्याप्रमाणे उद्या शुक्रवारीच साजरी होणार आहे. हिलाल कमिटीने देखील संध्याकाळी तसे जाहीर केले. दरम्यान ईदच्या खरेदीसाठी बुधवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी बाजारात खूप गर्दी केली होती. शिरखुरम्यासाठी मसाल्यासह बिर्याणीसाठीचे साहित्याची खरेदी मोठया प्रमाणावर सुरू होती.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने ईद कोरोना निर्बंधाचे पालन करूनच साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याची बुधवारी संध्याकाळी झालेल्या हिलाल कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. उद्या सकाळी मोजक्या पाच लोकांच्या उपस्थितीत मुस्लिम बोर्डिंग येथे ईदची नमाज होईल, उर्वरित ठिकाणी घरातच नमाज पठण करावयाची आहे, असे ही ठरले.
रमजानच्या नियमानुसार लोकांनी जकात व चंदा कोरोनामधील गरीब लोकांना दान करावे असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी केले आहे. ईदच्या नमाजमध्ये कोरोनापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी असेही आवाहन करण्यात आले.
मन्सून अली कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इरफान कासमी, आमीन अथणीकरर, बशीर नायकवडी, नाझीम पठाण, अब्दुल सिद्दीकी, मुफ्ती ताहीर बागवान, हाफीज अबुतालीव सिध्दीकी, अरउफ नायकवडी, मुबीन बागवान, अब्दुलसलाम कासमी यांच्या मुस्लिम बोर्डिंग कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो: १२०५२०२१-कोल-ईद
फोटो ओळ : शुक्रवारी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी बाजारपेठात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
(छाया: नसीर अत्तार)