रमजान ईदचा निर्णय आज होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:12+5:302021-05-12T04:26:12+5:30
कोल्हापूर : ईद कधी साजरी होणार याचा निर्णय आज, बुधवारी होणाऱ्या हिलाल कमिटीच्या बैठकीत ठरणार आहे. शासनाने ईदची सार्वजनिक ...
कोल्हापूर : ईद कधी साजरी होणार याचा निर्णय आज, बुधवारी होणाऱ्या हिलाल कमिटीच्या बैठकीत ठरणार आहे. शासनाने ईदची सार्वजनिक सुट्टी शुक्रवारी १४ ऐवजी १३ केल्याचे जाहीर केल्यानंतर रमजान ईद नेमकी कधी आहे यावरून विचारणा सुरू होती. याबाबत मुस्लिम बोर्डिंगकडे विचारणा केली असता आज, बुधवारी याबाबतीत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
रमजानच्या महिन्यात चंद्रदर्शनाला खूप महत्त्व असते. चंद्रदर्शन झाल्याशिवाय रोजे सुरू होत नाहीत आणि चंद्रदर्शन झाल्याशिवाय ईदही साजरी होत नाही. साधारणपणे ३० दिवसांचे रोजे असले तरी ३० व्या दिवशी ईद साजरी होते. यावर्षी ३० वा रोजा उद्या, गुरुवारी येत आहे. त्यातच अमावास्या झाली की ३६ तासांत चंद्रदर्शन होते ही भौगोलिक आकडेमोड आहे. हा हिशेब धरला तर कॅलेंडरमध्ये ठरल्याप्रमाणे शुक्रवारीच ईद होणार आहे.
दरम्यान, हा संभ्रम निर्माण झाल्याने आणि कोणत्याही क्षणी कडक लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने ईदसाठीच्या खरेदीसाठी मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र जागोजागी दिसत होते.