कोल्हापूरात परंपरागत पद्धतीने रमजान ईद उत्साहात
By admin | Published: June 26, 2017 02:18 PM2017-06-26T14:18:32+5:302017-06-26T14:18:32+5:30
विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये विश्वशांतीसाठी केली प्रार्थना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : नमाज पठण, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, शिरखुर्म्याचा आस्वाद आणि अधून-मधून पावसाच्या सरी झेलत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या भक्तिभावाने सोमवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.
दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणात तसेच शहरातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आले. पावसाच्या तुरळक सरीत मशिदींच्या पटांगणावर सकाळी नमाज पठण झाले. मुस्लिम बोर्डिंग येथे पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या जमातच्या नमाजासाठी मौलाना हाफिज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. सर्वांनी कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच विश्वाची सुख-शांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लिमबांधवांनी एकमेकांना अलिंगन देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी छत्रपती शाहू , खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक संजय मोहीते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत , भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, माजी महापौर आर. के. पोवार,राजू लाटकर, रमेश पोवार, इम्तियाज बागवान, नेहरु हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, नजीर महमद पाशा देसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक किरण शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत चेअरमन गणी आजरेकर यांनी, तर आभार संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी मानले.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, हा. लियाकत मुजावर, साजिद खान, अमीर हमजेखान शिंदी, हाजी जहाँगीर अत्तार, हाजी मुसा पटवेगार, रफिक खुतबुद्दीन मुल्ला, हाजी मुसा पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी आपल्या पै-पाहुण्यांसह अन्य धर्मिय मित्रपरीवारालाही शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले होते. कुटुंबातील महिलासह सर्व सदस्य आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात दिवसभर गुंतल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत शहरात ईदच्या उत्साहाचे वातावरण होते.
नमाज पठण झालेल्या मशिदी
बीडी कॉलनी मशीद, बाराईमाम मशीद, जमादार कॉलनी (सरनाईक वसाहत), सदर बझार मशीद, प्रगती कॉलनी मशीद,गवंडी मोहल्ला मशीद , विक्रमनगर मशीद, कब्रस्तान मशीद,केसापूर मशीद (ब्रह्मपुरी), अहिले हदीस मशीद (महाराणा प्रताप चौक), रंकाळा मशीद, मदिना मशीद (टाकाळा), सरदार कॉलनी मशीद, अलिफ अंजुम मद्रसा (लक्षतीर्थ), मणेर मशीद , चाँद मशीद (लक्षतीर्थ), मद्रसा (मणेर गल्ली) , बडी मशीद (बिंदू चौक), न्यू शाहूपुरी मशीद (बेकर गल्ली), लाईन बझार मशीद, शाहूपुरी थोरली मशीद (स्टेशनरोड), राजेबागस्वार मशीद.ईदगाह (नंगीवली मशीद), घुडणपीर या मशिदींमध्ये नमाज पठण झाले.