अर्जुनवाडा येथील हेमराज यादव यांना ‘रामानुजन फेलोशिप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:51+5:302021-02-10T04:24:51+5:30
कोल्हापूर : अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील डॉ. हेमराज यादव यांना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने पाच वर्षांसाठी ...
कोल्हापूर : अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील डॉ. हेमराज यादव यांना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने पाच वर्षांसाठी रामानुजन फेलोशिप जाहीर केली आहे. ते सध्या दक्षिण कोरियातील डोंगुक विद्यापीठ सेऊल येथे सहायक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.
परदेशात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना रामानुजन फेलोशिप दिली जाते. डॉ. यादव यांना या फेलोशिपबाबतचा ई-मेल दि. ३ फेब्रुवारीला मिळाला. त्यांनी दक्षिण कोरियामध्ये ऊर्जा, पर्यावरण आणि जैव-चिकित्सा या विषयांवर सात वर्षे काम केले आहे. त्यांनी सन २००६ दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथून रसायनशास्त्रात पदवी, तर २००९ मध्ये शिवाजी विद्यापीठातून उपयोजित रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सन २०१४ डी.वाय. पाटील विद्यापीठ मधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. पुढे त्यांनी सन २०१४ ते २०१७ दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल रिसर्च फेलो म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. यादव हे डोंगुक विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदी रुजू झाले. त्यांचे आतापर्यंत ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ते एशियन रिसर्च नेटवर्क, कोरिया आणि अमेरिकन केमिकल सोसायटीचे सदस्य आहेत. फोटोकॅटालिसिस, नॅनोमेटेरिल्स, बायोमेटीरल्स, ड्रग डिलिव्हरी, सुपरकॅपेसिटर, इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर, गॅस सेन्सर आदी त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. रामानुजन फेलोशिप मिळवून शिवाजी विद्यापीठात संशोधन करणारे डॉ. यादव हे पहिलेच शास्त्रज्ञ आहेत.
प्रतिक्रिया
आपल्या मायदेशी परत यावे आणि येथे आपले संशोधन कौशल्य वापरावे अशी माझी इच्छा आहे. रामानुजन फेलोशिप मिळाल्याचा खूप आनंद आहे. या फेलोशिपअंतर्गत पुढील संशोधन शिवाजी विद्यापीठातून करणार आहे.
-डॉ. हेमराज यादव
फोटो (०९०२२०२१-कोल-हेमराज यादव (फेलोशिप)