रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:45 PM2019-07-17T16:45:24+5:302019-07-17T16:50:07+5:30
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष कै. रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचा त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर भूपाल शेटे यांनी बुधवारी येथे बोलताना दिली.
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष कै. रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचा त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर भूपाल शेटे यांनी बुधवारी येथे बोलताना दिली.
कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देसाई यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृह येथे महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी महापौरांच्यावतीने बोलताना शेटे यांनी ही ग्वाही दिली. प्रारंभी महापौर गवंडी यांच्या हस्ते कै. देसाई यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात आला.
देसाई यांनी महापालिका चालली तरच आपला उदरनिर्वाह चालणार आहे असे सांगत महापालिकेचे हित पाहताना कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. सर्वसामान्य कर्मचारी आणि महापालिका हेच त्यांचे कुटुंब होते, अशा भावना यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या.
देसाई यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य स्फुर्तीदायी आहे, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले. माजी आमदार सुरेश साळोखे यांनी ६१८ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले.
देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा आमचा विचार होता, परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही घेऊ असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितले. त्यांनी कधीही एकतर्फी निर्णय घेतलेला नाही. तक्रार आल्यास दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन ते योग्य तो निर्णय घेत. महापालिकेच्या इतिहासात कर्मचारी संघास असा नेता कधी लाभणार नाही, असेही देशमुख म्हणाले. देसाई यांचे नेतृत्व कायम लक्षात रहावे यासाठी चौकाला, रस्त्याला अथवा एखादया दवाखान्याला त्यांचे नांव दयावे अशी सुचना आर.के.पोवार यांनी मांडली.
संघटनेचे कार्यअध्यक्ष विजय वणकुद्रे, नगरसेवक अजित ठाणेकर, प्रतिज्ञा उत्तूरे, किरण नकाते, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील,आदिल फरास, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, निशिकांत सरनाईक, अनिल घाटगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.