रमेशच्या कुटुंबीयांसाठी मदत निधी उभारणार
By Admin | Published: March 15, 2016 01:16 AM2016-03-15T01:16:51+5:302016-03-15T01:20:35+5:30
कार जळीत प्रकरण : आजरावासीयांचा पुढाकार; पोलिस ठाण्यात आज बैठक
आजरा : अमोल पवार व विनायक पवार यांनी हाळोली (ता. आजरा) येथे देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी केलेल्या कार जळीत प्रकरणात हकनाक बळी गेलेल्या रमेश नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आजरा पोलिस, दानशूर संस्था व व्यक्तींच्या सहकार्यातून निधी उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी आजरा पोलिस ठाण्यात बैठक आहे.
पोट भरण्यासाठी विजापूर येथून आलेल्या रमेश नाईक यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. पोटाच्या मागे गेलेला रमेश या हत्याकांडात मारला गेला एवढीच त्यांच्या घरच्यांना माहिती होती. जळून शिल्लक राहिलेल्या देहाचे अवयवही त्यांना मिळालेले नाहीत. कर्ती व्यक्ती कुटुंबातून निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य आजारी पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर रमेशच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांना असणाऱ्या आर्थिक व मानसिक मदतीची गरज ओळखून आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पुन्हा आजऱ्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी मसोली येथील रमेश याच्या कपड्यांची जाळून जेथे विल्हेवाट लावली त्या जागेची पाहणी करून पंचनामे केले. मसोली येथील दत्तू तुकाराम भोसले यांच्या गट नं. ७३ मधील जमिनीत (शेतात) हे कपडे अमोल व विनायक पवार यांनी जाळले असून, स्थानिक पोलिसपाटील, सरकारी पंच व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास या पथकाने पंचनामे झाल्याबरोबर पुढच्या तपासाच्या दिशेने प्रवास सुरू केला.