६० वर्षांत पहिल्यांदाच रथोत्सवाविना अंबाबाई मंदिरात श्री रामनवमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:56 PM2020-04-02T21:56:25+5:302020-04-02T22:01:39+5:30
दुपारी बारा वाजता महिला पोलीस कॉन्स्टेबलसह पुजा-यांनी पाळणा म्हणून श्रीरामाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला. रथोत्सव तर रद्दच करण्यात आला. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा रामाचा रथोत्सव रद्द झाल्याची माहिती पुजारी मणिकांचन झुरळे यांनी दिली.
कोल्हापूर : अभिषेक, सालंकृत पूजाविधी, पुजाऱ्यांसह मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पाळणा म्हणत गुरुवारी श्री रामनवमी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच रथोत्सवाविना अंबाबाई मंदिरात श्री रामनवमी पार पडली.
सध्या भारतात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशभरात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडायची आणि धार्मिक कार्यक्रमांवरच बंदी आहे. त्याचा परिणाम लहान-मोठ्या यात्रा उत्सवांप्रमाणे रामनवमीवरदेखील झाला आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रीरामाचे मंदिर आहे.
येथे गुढीपाडव्यापासून श्री रामाचा नवरात्रौत्सव सुरू होतो आणि रामनवमीला त्याची सांगता होते. रात्री रथोत्सव होतो, भाविकांचीही अलोट गर्दी असते. यंदा मात्र हे चित्रच बदलले. गुरुवारी सकाळी पुजारी मणिकांचन झुरळे यांच्यासह मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत अभिषेक झाला.
त्यानंतर श्रींची सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता महिला पोलीस कॉन्स्टेबलसह पुजा-यांनी पाळणा म्हणून श्रीरामाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला. रथोत्सव तर रद्दच करण्यात आला. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा रामाचा रथोत्सव रद्द झाल्याची माहिती पुजारी मणिकांचन झुरळे यांनी दिली.