मैदानाबाहेर सामना हुल्लडबाजी : उत्तरेश्वर विरुद्ध जुना बुधवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:04 AM2018-01-17T01:04:05+5:302018-01-17T01:04:11+5:30
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीगअंतर्गत संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ फुटबॉल संघ व उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम फुटबॉल संघ यांच्यातील सामन्यानंतर विजयी संघाच्या समर्थकांनी
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीगअंतर्गत संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ फुटबॉल संघ व उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम फुटबॉल संघ यांच्यातील सामन्यानंतर विजयी संघाच्या समर्थकांनी दिलबहार तालीम चौक ते आझाद चौक परिसरादरम्यान सुमारे एक तासाहून अधिक काळ हुल्लडबाजी करीत मोठा गोंधळ घातला. पोलिसांच्या मोठ्या पोलीस कुमकीमुळे दोन्ही संघांच्या समर्थकांमधील हाणामारी टळली. या हुल्लडबाजीमुळे फुटबॉलप्रेमींमध्ये चिंतेचा सूर उमटत आहे.
मंगळवारी दुपारी के.एस.ए. लीग स्पर्धेतील चौथ्या फेरीअखेर वाघाची तालीम फुटबॉल संघ व संयुक्त जुना बुधवार फुटबॉल संघ आमने-सामने आले होते. त्यात दोन्ही संघांच्या समर्थकांकडून गेल्या चार दिवसांपासून पोस्टरवॉर व सोशल मीडियावरून मोठे युद्ध रंगले होते. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे व जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सामना जसा रंगतदार होत गेला तसा दोन्ही समर्थकांमध्ये शिवीगाळ, एकमेकांना हिणवणे, प्रसंगी एकमेकांवर धावून जाणे असे प्रकार वारंवार होऊ लागले.
या आरडाओरडी व घोषणाबाजीमुळे स्टेडियम दणाणून निघाले होते. मैदानातील खेळाडूंपेक्षा समर्थकांचाच जोश अधिक होता. वाढती हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी माईकवरून त्वरित एकमेकांना फालतू शेरेबाजी व गोंधळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यात सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे आपल्या गोंधळाचे चित्रीकरण होत आहे. त्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. सामनाही संपला. स्टेडियममधून बाहेर पडल्यानंतर एका संघाच्या समर्थकांनी विजयाप्रीत्यर्थ मैदानाबाहेर पडताच दिसेल त्या गाडीवर नाचणे, रस्ता अडवून हलगीच्या तालावर नाचणे, शिवीगाळ, शेरेबाजी असे सुमारे एक तासाहून अधिक काळ हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. प्रतिस्पर्धी तालमीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांना आवरत दुसºया बाजूने बाहेर काढले. त्यात पोलिसांची जादा कुमक आल्यानंतर हा गोंधळ काही वेळाने संपला असे वाटले; पण विजयी संघाच्या समर्थकांनी हलगी वाजवत शहराच्या प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढली. अशा प्रकाराने महत्प्रयासाने सुरू झालेला कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा एकदा बंद पडतो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.