पारगडच्या तटबंदीला झाडाझुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:34+5:302021-02-06T04:44:34+5:30

नंदकुमार ढेरे चंदगड : तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या किल्ले पारगडावरील शिवकालीन दगडी तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडली आहे. आठ फूट रुंदीच्या ...

The ramparts of Pargad are overgrown with bushes | पारगडच्या तटबंदीला झाडाझुडपांचा विळखा

पारगडच्या तटबंदीला झाडाझुडपांचा विळखा

Next

नंदकुमार ढेरे

चंदगड : तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या किल्ले पारगडावरील शिवकालीन दगडी तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडली आहे. आठ फूट रुंदीच्या दगडी तटबंदी भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांची मुळे दगडी भिंतीत शिरून तटबंदीचा एकजीवपणा तुटत असल्याने तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने पारगडचा विकास आवश्यक आहे.

शासनाने पारगडच्या विकासासाठी निधी मंजूर करून ढासळणाऱ्या तटबंदीची डागडुजी करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी नागरिकांतून होत आहे.

गोव्यातील पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सन १६७४ मध्ये पारगड किल्ला वसवला. कोंढाणा लढाईत वीरगती पावलेले तानाजी मालुसरे यांचा पुत्र रायबा ऊर्फ रायाजी मालुसरे यांची पहिला किल्लेदार म्हणून नेमणूक करीत पाचशे मावळे त्याच्या दिमतीला दिल्याचा इतिहास आहे. गडावर मनुष्यवस्ती असलेला पारगड किल्ला आजही समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. रस्ते, पाणी, गटारे, आदी अन्य भौतिक सुविधांची गडावर वानवा आहे. पारगडच्या संरक्षणासाठी बांधलेल्या आठ फूट भक्कम तटबंदीचे दगड ढासळत आहेत.

वाहतुकीची कोणतीही सुविधा नसलेल्या काळात एवढे मोठे दगड कुठून आणले असावेत, हाच पर्यटक व शिवप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे. तीच तटबंदी शासनाच्या उदासीन धोरणामुळे ढासळायला सुरुवात झाली आहे. हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तत्काळ कार्यवाही होण्याची गरज आहे. गडावरील रहिवासी शेलार यांचे वंशज व सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी शासनाने गडावरील रस्ते, पिण्याचे पाणी या सुविधांसह रहिवाशांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करावे, अशी मागणी केली आहे.

---------------------------

पारगडचा प्रतिमहाबळेश्वर झाले का?

पारगडला प्रतिमहाबळेश्वर करून पर्यटनाच्या दृष्टीने गडाचा विकास करण्याच्या अनेक घोषणा झाल्या; पण अद्यापही पारगडावर विकास काही पोहोचलेला नाही. पारगडवासीय मात्र त्या विकासाची वाट पाहत आहेत.

-----------------------

* फोटो ओळी : किल्ले पारगड (ता. चंदगड) येथील गडावरील तटबंदीला असा झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. झाडांची मुळे तटबंदीमध्ये घुसून तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे.

क्रमांक : ०५०२२०२१-गड-०१

Web Title: The ramparts of Pargad are overgrown with bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.