तृतीयपंथीयांचे रॅम्पवॉक, राज्यातील पहिला 'फॅशन शो' कोल्हापुरात
By संदीप आडनाईक | Published: May 20, 2024 06:10 PM2024-05-20T18:10:06+5:302024-05-20T18:11:10+5:30
कोल्हापूर : हम किसींसे कम नहीं म्हणत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १६ तृतीयपंथीय स्पर्धकांनी सोमवारी कोल्हापुरात रॅम्पवॉक करून समानतेचा ...
कोल्हापूर : हम किसींसे कम नहीं म्हणत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १६ तृतीयपंथीय स्पर्धकांनी सोमवारी कोल्हापुरात रॅम्पवॉक करून समानतेचा संदेश देत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या फॅशन शोमध्ये इतिहास घडवला. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या रिया मयूरी आळवेकरने प्रथम, मिरजेच्या दीपा नाईकने द्वितीय आणि पुण्याच्या दक्षता पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला.
येथील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग आणि मैत्री फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने नागाळा पार्क येथील रोटरी क्लबच्या सभागृहात दुपारपर्यंत दोन राज्यांतून सहभागी झालेल्या तृतीय पंथीयांनी रॅम्प वॉक करत या फॅशन शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार ट्रॅडिशनल राऊंड, फ्री लान्स राऊंड आणि टॅलेंट राऊंड अशा तीन फेऱ्या पार पडल्या. परीक्षक म्हणून सायबर महिला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योती हिरेमठ, प्रा. प्रज्ञा कापडी आणि मिस इंडिया डॉ. वैदेही पोटे यांनी काम पाहिले. यावेळी वामाज साडीचे गिरीश कर्णावत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मनीषा संकपाळ, सायबरच्या समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. सोनिया राजपूत यांनी सहकार्य केले.
योगिता माने हिची दिलखेचक लावणी
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत ३००० लावणी कार्यक्रम करणाऱ्या योगिता जयंत माने हिने प्रारंभीच दिलखेचक लावणी सादर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत कोल्हापूरची अंकिता आळवेकर, धुळे येथील ट्रान्समॅन मयूर सोळंकी, पहिला तृतीयपंथीय शिक्षिका सिंधुदुर्गातील रिया मयूरी आळवेकर, कोल्हापूरची स्मिता वदन, मिरजेची दीपा नाईक, बेळगावचा अमेय पाटील, कोल्हापूरची शिवानी बारदेस्कर, मैत्री फाउंडेशनच्या मयूरी आळवेकर, करिना कोळी, झोया दिन्नी, सिद्धी निलंजकर, पुण्याची दक्षता पाटील यांनी भाग घेतला.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मैत्री फौंडेशनच्या मयूरी आळवेकर, संग्राम संस्थेच्या माया गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी स्मिता कांबळे यांनी आभार मानले. रितेश कांबळे आणि राधिका बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबचे आकाश बिरंजे, मोहन तायडे, नेहा सूर्यवंशी, पूर्वा सावंत, डॉ. सुरेश आपटे, ॲड. डॉ. अश्विनी बाटे, वैष्णवी पवार, प्रा. पूनम माने, प्रा. शर्वरी काटकर, योगिता माने, पृथ्वी पाटील, संजय देशपांडे, संकेत पाटील, समाजकल्याण तालुका समन्वयक सुरेखा डवर, कोल्हापूर जिल्हा देवदासी समाज संघटनेचे दत्ता पवार, आदी उपस्थित होते.