जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची आजपासून रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:16+5:302020-12-23T04:21:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची आजपासून रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची आजपासून रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन अर्ज भरून स्वाक्षरीसह संबंधित कार्यालयातही द्यावी लागणार आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाने गती घेतली आहे.
ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. साधारणत: सुटीचे दिवस वगळता सहा दिवसच अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. त्यातही मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याकडे अनेकांचा कल असतो. आज आणि सोमवार व मंगळवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्जासोबत कागदपत्रांसह राखीव गटासाठी शंभर रूपये, तर खुल्या गटासाठी पाचशे रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
कागदपत्रांची जमवाजमव
उमेदवारी अर्जासोबत सोळा विविध प्रकारची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. त्यांची जमवाजमव करताना इच्छुकांची दमछाक उडताना दिसत आहे. त्यात राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जातीचा दाखला व त्याच्या पडताळणी प्रमाणपत्रासाठी कसरत करावी लागत आहे.
अर्जासोबत लागणार ही कागदपत्रे...
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत
मतदार यादीत नाव असलेल्या पानाची सत्यप्रत
अनामत रक्कम पावती
राष्ट्रीयीकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन खाते
दायित्व घोषणापत्र
अपत्यांचा दाखला
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र
राखीव गटातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र अथवा पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोहोच
पडताळणी प्रमाणपत्र बारा महिन्यात देण्याबाबतचे हमीपत्र
निवडणूक खर्च वेळेत दाखल करण्याबाबतचे हमीपत्र
ग्रामपंचायत कर, शौचालय, ठेकेदार नसल्याचा दाखला
असा राहणार निवडणुकीचा कार्यक्रम...
उमेदवारी अर्ज - २३ ते ३० डिसेंबर
अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर
माघार व चिन्हे वाटप - ४ जानेवारी
मतदान - १५ जानेवारी (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० )
मतमोजणी - १८ जानेवारी
- राजाराम लोंढे